Hyundai कंपनीनं विना अट माफी मागावी; शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वैदी संतापल्या, काय आहे प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 05:58 PM2022-02-07T17:58:40+5:302022-02-07T18:13:09+5:30
Boycot Hyundai Trending: सोमवारी संसदेच्या अधिवेशनात सहभागी झाल्यानंतर प्रियंका चतुर्वैदी यांनी या विषयावर भाष्य केले.
नवी दिल्ली – देशातील कार उत्पादक कंपनी ह्युंदाईनं विना अट माफी मागावी अशी मागणी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. कंपनी व्यवसाय भारतात करते, भारतीयांकडून नफा कमवते आणि काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानच्या सूरात सूर मिसळते असा आरोप करत खासदार प्रियंका चतुर्वैदींनी कंपनीवर आगपाखड केली आहे. कंपनीचे हे कृत्य खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रियंका चतुर्वैदी म्हणाल्या की, कंपनीनं जे लेटर प्रकाशित केले आहे त्याला माफीनामा बोलू शकत नाही. सोशल मीडियावरील एका पोस्टनं हा वाद सुरु झाला आहे. ह्युंदाईपाकिस्तान ट्विटर हँडलवरुन कंपनीनं म्हटलं होतं की, याद करा, काश्मिरी बंधूच्या बलिदानाला आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करतायेत त्यांना पाठिंबा द्या. त्याचसोबत #HyundaiPakistan #KashmirSolidarityDay हॅशटॅग पोस्ट केला आहे. त्यानंतर यावर कंपनीनं स्पष्टीकरण दिलं आहे.
सोमवारी संसदेच्या अधिवेशनात सहभागी झाल्यानंतर प्रियंका चतुर्वैदी यांनी या विषयावर भाष्य केले. कंपनीनं एक पत्र प्रकाशित केले आहे. त्यात माफीनामाही नाही. तुम्ही बिझनेस इथं करता आणि भारतीयांकडून नफा कमवता त्यानंतर आमच्याविरोधातच बोलता. काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तानसोबत उभं राहणार हे आम्ही मान्य करणार नाही. कंपनीने विना अट संपूर्ण भारताची माफी मागितली पाहिजे अशी मागणी प्रियंका चतुर्वैदी यांनी केली.
काय आहे प्रकरण?
रविवारी ह्युंदाई पाकिस्तानच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवर काश्मीरवरुन एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर भारतीयांनी या पोस्टवर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या. भारतात #BoycottHyundai हे कॅम्पेन सुरु झालं. हा वाद वाढलेला पाहता हुंडई पाकिस्तान कंपनीनं त्यांच्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट डिलीट ली. परंतु सोशल मीडियात त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. त्यानंतर कंपनीने अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक निवेदन जारी केले.
कंपनीने म्हटलं की, मागील २५ वर्षाहून अधिक काळ ह्युंदाई मोटार इंडिया भारतीय बाजारात स्थान निर्माण केले आहे. राष्ट्रवादासाठी आम्ही सदैव सन्मानाने उभे आहोत. सोशल मीडियावर जी पोस्ट व्हायरल झाली त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या. भारत ह्युंदाई ब्रॅन्डचं दुसरं घरं आहे. आम्ही व्हायरल झालेल्या पोस्टच्या विचारांशी सहमत नसून आम्ही त्याचा निषेध करतो. आम्ही देशवासियांसोबत कायम आहोत असं कंपनीने स्पष्ट केले आहे.