दंगली पेटविण्याचा होता इसिसचा डाव
By Admin | Published: July 1, 2016 05:13 AM2016-07-01T05:13:30+5:302016-07-01T05:13:30+5:30
हैदराबाद शहरातील मंदिरांमध्ये गोमांस ठेवून दंगली पेटविण्याचा इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचा डाव होता
नवी दिल्ली/हैदराबाद : शक्तिशाली बॉम्ब पेरून अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासोबतच हैदराबाद शहरातील मंदिरांमध्ये गोमांस ठेवून दंगली पेटविण्याचा इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या सूत्रांनी (एनआयए) दिली आहे.
एनआयएने बुधवारी जुन्या हैदराबादेत केलेल्या कारवाईत इसिसच्या ११ संशयितांना ताब्यात घेतले होते. तपास संस्था गेल्या चारपाच महिन्यांपासून या तरुणांवर नजर ठेवून होती. अटकेतील हे तरुण इसिसचा भारतातील हस्तक शफी अरमर याच्या संपर्कात होते. २५ जूनच्या सायंकाळी त्यांचे दूरध्वनीवरील संभाषण ऐकल्यानंतर एनआयएने तातडीने कारवाई केली. या संभाषणादरम्यान एका संशयिताने दुसऱ्याला गाय आणि म्हशीच्या मांसाचे तुकडे आणण्यास सांगितले होते. गोमांसाचे तुकडे शहरातील विविध मंदिरांमध्ये टाकून दंगली घडविण्याचा त्यांचा कट होता, असे सूत्रांनी सांगितले. अटकेतील सर्व तरुण २० ते ३० वर्षे वयोगटातील असून, नोकरी करणारे आहेत.
दहशतवाद्यांचा हा गट हिंसक कारवायांसाठी आयईडी तयार करीत होता आणि एका आॅनलाइन हँडलरद्वारे त्यांना आदेश दिले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. इसिसचा हा हस्तक इराक अथवा सिरियामध्ये होता, असा संशय आहे.
हैदराबादेतील काही तरुण आणि त्यांचे साथीदार देशाच्या विविध भागांमधील धार्मिक स्थळे आणि संवेदनशील सरकारी इमारतींसह सार्वजनिक ठिकाणांवर हल्ल्यासाठी शस्त्रास्त्र आणि स्फोटके गोळा
करून भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचत असल्याची ठोस माहिती मिळाल्याच्या आधारे एनआयएने यापूर्वीच एक गुन्हा नोंदविला होता. (वृत्तसंस्था)
>जप्त केलेले साहित्य
धाडीदरम्यान शस्त्रास्त्र, गोळाबारूद, स्फोटकांच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी रसायने, डिजिटल सामग्री आणि १५ लाख रुपये जप्त केले होते. याशिवाय २ सेमी आॅटोमॅटिक पिस्तुले, टेलिस्कोप लावलेली एअरगन, टारगेट बोर्ड, ६ लॅपटॉप, जवळपास ४० मोबाइल फोन, ३२ सिमकार्ड, मोठ्या संख्येत हार्डडिस्क, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, डिजिटल टॅब आदी साहित्यही सापडले आहे.