... तो देशद्रोह असल्याचं मी मान्य करतो, काश्मिरी नेत्यांच्या भूमिकेवर संजय राऊत भडकले
By महेश गलांडे | Published: October 28, 2020 10:14 AM2020-10-28T10:14:50+5:302020-10-28T10:27:46+5:30
काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर तेथील स्थानिक नेत्यांनी एकत्र येत विरोध दर्शवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत याबाबत विधान केले होते.
मुंबई - जोपर्यंत जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही, तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही, असे विधान जम्मू आणि काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी केले होते. त्यामुळे, मेहबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध तीव्र संताप करण्यात येत आहे. मुफ्ती यांच्या या विधानानंतर भाजपा समर्थकांना श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा झेडा फडकविण्याचा प्रयत्न केला होता. आता, मेहबुबा यांच्या भूमिकेवरुन शिवसेनेनंही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, याप्रकरणी केंद्र सरकारने कडक भूमिका घ्यायला हवी, असे म्हटले आहे.
काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर तेथील स्थानिक नेत्यांनी एकत्र येत विरोध दर्शवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत याबाबत विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, आम्ही कलम 370 पुन्हा आणणारच आणि असे होईपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. तसेच, मेहबूबा मुफ्ती यांनी भारताच्या राष्ट्रीय ध्वजाबद्दल अपमानास्पद भाष्य केले. जेव्हा आमचा जम्मू काश्मीरचा ध्वज परत येईल, तेव्हाच आम्ही तो (तिरंगा) ध्वजही घेऊ. काश्मीरचा ध्वज आमच्या आयुष्याचा एक भाग आहे, तो आमचा ध्वज आहे. या ध्वजासोबत आमचे नाते आहे, असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या. मेहबुबा मुफ्तींच्या या विधानावर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
जर चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लादण्याचा प्रयत्न मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला यांच्याकडून होत असेल, तर केंद्र सरकारने या नेत्यांवर कडक कारवाई करायला हवी. तसेच, जर काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज फडकवताना कोणी विरोध करुन गोंधळ घालत असेल, तिरंगा फडकविण्यासाठी मनाई करत असेल, तर तो देशद्रोह असल्याचं मी मान्य करतो, असेही खासदार राऊत यांनी म्हटलंय.
If Mehbooba Mufti, Farooq Abdullah & others want to impose Article 370 in Kashmir with help of China then central govt should take strict steps. If any person who wants to unfurl tri-colour in Kashmir is stopped, then I consider it as 'Rashtra droh': Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/mhqzLHlI2V
— ANI (@ANI) October 28, 2020
पीडीपीच्या 3 नेत्यांचा राजीनामा
मेहबुबा मुफ्ती यांच्या झेंड्यासंदर्भातील विधानावर नाराज होत पीडीपीच्या तीन नेत्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या पीडीपी नेत्यांमध्ये टीएस बाजवा, वेद महाजन आणि हुसेन-ए-वफा यांच्या नावांचा समावेश आहे. 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, "पीडीपी नेते टीएस बाजवा, वेद महाजन आणि हुसेन-ए-वफा यांनी पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे. या नेत्यांनी मेहबूबा मुफ्ती यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही तुमच्या काही कामांवर, वक्तव्यांवर नाराज आहोत. विशेष म्हणजे, देशभक्तीच्या भावनेचा अनादर केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्हाला अस्वस्थ वाटत आहे."
फारुक अब्दुलांनीही केलं होतं वादग्रस्त विधान
काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांनीही असंच वादग्रस्त विधान केले होते, काश्मिरी लोकांना मोदी सरकारवर विश्वास राहिला नाही अशी लोकांची मानसिकता आहे. फाळणीच्या वेळी खोऱ्यातील लोकांना पाकिस्तानमध्ये जाणे सोपे होते, परंतु त्यांनी गांधींजींचा भारत निवडला होता, मोदींचा भारत नाही. आज चीन दुसर्या बाजूने पुढे सरकत आहे. जर आपण काश्मिरींशी चर्चा केली तर बरेच लोक चीनने भारतात यावं असं म्हणतायेत. चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही. परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत, असं फारुक अब्दुला म्हणाले होते.
मेहबुबा यांनी कुटुंबासह पाकिस्तानात जावे
नितीन पटेल यांनी गुजरात पोटनिवडणुकीतील विधानसभा उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मेहबुबा मुफ्ती यांच्यावर निशाणा साधला. मेहबुबा या गेल्या 2 दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, त्यांनी विमानाचं तिकीट खरेदी कराव आणि सहकुटुंब सहपरिवारसह कराचीला जावे, सर्वांसाठीच हे योग्य असेल. त्यासाठी, करजन तालुक्याची जनता त्यांना तिकीटाचे पैसैही देऊन करेल, अशा शब्दात गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांनी मेहबुबा मुफ्तींवर जबरी टीका केली. ज्यांना भारत देश आवडत नाही, किंवा सरकारने बनविलेल्या सीएए कायद्याला मानने आणि आर्टीकल 370 ला हटविणे पसंत नाही, त्यांनी पाकिस्तानला जायला हवं, असेही पटेल यांनी म्हटले. वडोदराच्या कुराली गावात पोटनिवडणुकीनिमित्त आयोजित भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत ते बोलत होते.