'मीसुद्धा एक हिंदू मुलगी, हिंदुत्ववादाचा खेळ माझ्यासोबत खेळू नका'; ममता बॅनर्जी कडाडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 08:03 AM2021-03-11T08:03:40+5:302021-03-11T08:05:34+5:30
नंदीग्राम येथे तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी चंडीपाठ या धार्मिक लेखातील मंत्रांचे पठण केले.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झालेली असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधील निवडणूक रॅलीत भाजपावर निशाणा साधला.
नंदीग्राम येथे तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी चंडीपाठ या धार्मिक लेखातील मंत्रांचे पठण केले. “मी दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी चंडीपाठाचे उच्चारण करते,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या, भाजपाने “हिंदुत्ववादाचा खेळ माझ्याबरोबर खेळू नये” असेही त्यांनी ठणकावले. तसेच मीसुद्धा एक हिंदू मुलगी आहे. माझ्याबरोबर हिंदुत्ववादाचा खेळू नका. मला सांगा, एक चांगला हिंदू कसे बनता येतं ते तुम्हाला माहित आहे का, असा सवालही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.
तत्पूर्वी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणुक प्रचारादरम्यान दुखापतीचा सामना करावा लागला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आपल्या कारबाहेर कार्यकर्त्यांशी बोलून कारमध्ये शिरण्याच्या बेतात असताना काही समाजकंटकांनी कारचा दरवाजा त्यांच्या दिशेने ढकलल्याने पायाला जखम झाली.
नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्या एका मंदिरात गेल्या होत्या. तेथून बाहेर आल्यावर त्या कारपाशी उभ्या राहून कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. त्यानंतर त्या कारमध्ये शिरत असताना दरवाजा आतील बाजूस ढकलण्यात आला, त्यामुळे त्यांच्या पायाला जखम झाली. त्यांच्या पायाला सूज आली असून, अंगातही कणकण आहे. या प्रकारानंतर त्यांना ताबडतोब कोलकात्याला आणण्यात आले.
Nandigram: West Bengal CM Mamata Banerjee says she has suffered an injury in her leg after few people pushed her as when she was near her car pic.twitter.com/wx69lVdsbB
— ANI (@ANI) March 10, 2021
भाजपावर संशय
तुम्ही आम्हाला परक्या आहात, अशी पोस्टर्स नंदीग्राममध्ये भाजपने लावली आहेत. त्यामुळे तेथील तृणमूलचे कार्यकर्ते संतापले आहेत. अशातच हा प्रकार घडल्याने यामागे भाजपचे लोक असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.