'मी माझ्या कामात व्यस्त आहे, सहकार्य करु शकत नाही', सीबीआयच्या ई-मेलवर नीरव मोदीचं उर्मट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 12:18 PM2018-03-01T12:18:11+5:302018-03-01T12:18:11+5:30
पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यवसायिक नीरव मोदीने सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासाठी नकार दिला आहे
मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यवसायिक नीरव मोदीने सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासाठी नकार दिला आहे. सीबीआयने नीरव मोदीला ई-मेल लिहून तपासात सहभागी होण्यास सांगितलं होतं. यावर नीरव मोदीने स्पष्टपणे नकार दिला आहे. मी परदेशात माझ्या व्यवसायानिमित्त व्यस्त आहे असं कारण नीरव मोदीने दिलं आहे. यानंतर सीबीआयने पुन्हा एकदा नीरव मोदीला पत्र लिहित पुढील आठवड्यात करण्यात येणा-या चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
सीबीआयने नीरव मोदीला 12,636 कोटी रुपयांच्या घोटाळा तपासात सहभागी होण्यास सांगितलं होतं. नीरव मोदीने दाखवलेल्या उर्मटपणानंतर सीबीआयने पुन्हा एकदा कठोर शब्दांत पत्र पाठवत कारणं चालणार नाहीत असं म्हटलं आहे. कोणत्याही आरोपीला तपासात सहभागी करुन घेण्यासाठी कळवणं गरजेचं असतं. सीबीआयने नीरव मोदीला ज्या देशात असशील तेथील भारतीय दुतावासाला संपर्क साधण्यास सांगितलं होतं. त्याची भारतात येण्याची व्यवस्था केली जाईल.
याआधी नीरव मोदीने आपल्या वकिलाच्या माध्यमातून या प्रकरणाची निप्पक्ष चौकशी होईल की नाही अशी शंका व्यक्त केली होती. जोपर्यंत निष्पक्ष चौकशीचं आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आपण भारतात येण्याचा निर्णय घेऊ शकत नाही असं निरव मोदीने म्हटलं होतं.
दुसरीकडे, सीबीआयने पीएनबी आर्थिक घोटाळा प्रकरणी बँकेचे मुख्य परीक्षक (चिफ ऑडिटर) एम के शर्मा यांना अटक केली. बँकेच्या कर्मचा-याची ही पहिली अटक असल्याचं सांगितलं जात आहे. बँकेच्या लेखा परीक्षणाचे ते प्रमुख होते. इतका मोठा घोटाळा लेखा परीक्षकांच्या लक्षात यायलाच हवा होता. तो त्यांच्या लक्षात आला नाही की, त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं हे सीबीआय तपासून पाहत आहे. घोटाळ्यात त्यांची काही भूमिका नव्हती ना, हेदेखील तपासून पाहिलं जात आहे.