"मी तर केवळ महिला शिक्षणासंदर्भात..."; 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर नितीश कुमारांनी जाहीर माफी मागितली!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 12:03 PM2023-11-08T12:03:19+5:302023-11-08T12:04:52+5:30

यासंदर्भात आता नितीश यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ज्यात त्यांनी जाहीर माफी मागितली आहे.

I am concerned only with women's education Nitish Kumar publicly apologized after that controversial statement | "मी तर केवळ महिला शिक्षणासंदर्भात..."; 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर नितीश कुमारांनी जाहीर माफी मागितली!

"मी तर केवळ महिला शिक्षणासंदर्भात..."; 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर नितीश कुमारांनी जाहीर माफी मागितली!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात विधानसभेत केलेल्या बेताल वक्तव्यानंत, केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यासंदर्भात आता नितीश यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ज्यात त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. नितीश म्हणाले, 'मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो. मी काही चूक बोललो असेल, मी माफी मागतो. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, मी त्यांचेही अभिनंदन करतो." 

पुढे मुख्यमंत्री नितीश म्हणाले, आम्ही बिहारमध्ये मोठ-मोठी कामे केली आहेत आणि आता आम्ही महिलांच्या उत्थानासाठीही काम करत आहोत. एवढेच नाही, तर नितीश यांनी सभागृहातही माफी मागितली आहे. आपल्या वक्तव्याचा आपल्याला खेद वाटतो, असे म्हटले आहे. तसेच, ते त्यांचे वक्तव्य मागे घेत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे."

काय म्हणाले होते नितीश - 
बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (७ नोव्हेंबर) चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते, "बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मूलं जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल."

मी नितीश कुमार यांच्याकडे तत्काळ आणि स्पष्ट माफीची मागणी करते - 
नितीश कुमार यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. नितीश यांच्या या वक्तव्यानंतर, आता राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगानेही भाष्य केले आहे. 'या देशातील प्रत्येक महिलेच्या वतीने आणि राष्ट्रीय महिला आयोगाची अध्यक्ष या नात्याने, मी नितीश कुमार यांच्याकडे तत्काळ आणि स्पष्ट माफीची मागणी करते. विधानसभेतील त्यांचे असभ्य वक्तव्य, हे प्रत्येक महिलेच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा अपमान आहे. त्याची भाषा अत्यंत अपमानास्पद आणि घाणेरडी आहे. जर लोकशाहीत एखादा नेता उघडपणे अशा स्वरुपाचे भाष्य करत असेल, तर राज्यातील महिलांची काय स्थिती असेल, याची कल्पना येऊ शकते. त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करते, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

Web Title: I am concerned only with women's education Nitish Kumar publicly apologized after that controversial statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.