'निराश अन् भयभीत झाले...', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 03:51 PM2024-08-28T15:51:02+5:302024-08-28T15:51:54+5:30
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांवरील गुन्ह्यांबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
Kolkata Rape-Murder Case : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पश्चिम बंगालसह देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, बंगालमध्ये भाजपने सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. दरम्यान, आता देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीदेखील या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "ही घटना अतिशय वेदनादायक आणि भयावह आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Society needs ‘honest, unbiased self-introspection’, ask itself some difficult questions: President Murmu to PTI on crimes against women
— Press Trust of India (@PTI_News) August 28, 2024
पीटीआयशी बोलताना द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, "बसं आता खूप झालं...कोणताही सुसंस्कृत समाज महिलांवर असे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला 'प्रामाणिक, निःपक्षपाती आत्मनिरीक्षणाची' आणि स्वतःला काही कठोर प्रश्न विचारण्याची गरज आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. निर्भयाच्या घटनेनंतर आपल्याला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसते."
In 12 years since Nirbhaya, countless rapes have been forgotten by society; this 'collective amnesia' is obnoxious: President Murmu to PTI
— Press Trust of India (@PTI_News) August 28, 2024
राष्ट्रपती पुढे म्हणतात, "त्या प्रकरणानंतर 12 वर्षात असंख्य बलात्कार झाले, ज्यांना समाज विसरला आहे. आता भारताला इतिहासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. या संकटाचा आपण सर्वसमावेशकपणे सामना केला पाहिजे. कोलकातामध्ये विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत असतानाही गुन्हेगार कुठेतरी लपून बसले आहेत," अशी प्रतिक्रिया मुर्मू यांनी दिली.
Societies scared to face history resort to collective amnesia; time now for India to face history squarely: President Murmu to PTI
— Press Trust of India (@PTI_News) August 28, 2024
काय आहे कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण?
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट रोजी 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या अंगावर कपडे नव्हते, शरीरावर जखमा होत्या, रक्तस्त्राव होत होता. तिच्यावर बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांमध्ये असंतोष वाढला आणि ते संपावर गेले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे. या प्रकरणाला वेग आला तेव्हा उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत सीबीआयला आतापर्यंतच्या तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.