मी भगवान विष्णूचा अवतार! ऑफिसला यायला सवड नाही - सरकारी कर्मचाऱ्याचे तऱ्हेवाईक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 10:10 AM2018-05-20T10:10:05+5:302018-05-20T10:10:05+5:30
‘मी भगवान विष्णूचा १० वा अवतार कल्की आहे. घरी बसून संपूर्ण जगाची मानसिकता बदलण्याचे कार्य मी करीत आहे.
अहमदाबाद : ‘मी भगवान विष्णूचा १० वा अवतार कल्की आहे. घरी बसून संपूर्ण जगाची मानसिकता बदलण्याचे कार्य मी करीत आहे. त्यामुळे रटाळ कामासाठी आॅफिसमध्ये यायला मला सवड नाही, असे त-हेवाईक उत्तर गुजरात सरकारच्या सेवेतील एका ज्येष्ठ अभियंत्याने त्याच्या आॅफिसला दिले आहे.
या अभियंत्याचे नाव रमेशचंद्र फेरार असे आहे. सरदार सरोवर पाटबंधारे प्रकल्पाशी संबंधित स्वतंत्र सरकारी संस्थेत ते अधीक्षक अभियंता आहेत. गेल्या वर्षी २२ सप्टेंबरला नव्या पदावर ते फक्त १८ दिवस हजर होते. त्यामुळे आॅफिसने त्यांना पाठवलेल्या शिस्तभंगाची नोटिशीच्या उत्तरात फेरार म्हणतात, जगाच्या उद्धारासाठी मी अखंड ध्यानधारणा करीत असतो. याआधी असुरी शक्तींनी गुजरातचा पाऊस पळविण्याचा केलेला प्रयत्न मी योगसामर्थ्याच्या जोरावर हाणून पाडत दुष्काळ टाळला. आता हेच कार्य संपूर्ण देशासाठी करण्याऐवजी आॅफिसात मी रटाळ काम करावी, अशी अपेक्षा आहे का?
#Gujarat: A state govt official named Rameshchandra Fefar has claimed that he's incarnation of Kalki, the 10th incarnation of Lord Vishnu, & can't come to office because 'he remains in fifth dimension which makes it impossible for him to come to office'. pic.twitter.com/fOSyj9i5Xu
— ANI (@ANI) May 19, 2018
सोशल मीडियात चर्चा
फेरार यांचे उत्तर सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. हा अभियंता राजकोटच्या कलावाड रोडवर एका आलिशान बंगल्यात राहतो. गेल्या एप्रिलमध्ये त्यांच्या पत्नीने त्यांच्याविरुद्ध मानसिक छळाची तक्रार पोलिसात केली आहे.