मै इंदिराजीकी बहू हूं... किसीसे डरनेवाली नही!
By admin | Published: December 9, 2015 01:35 AM2015-12-09T01:35:24+5:302015-12-09T01:35:24+5:30
नॅशनल हेराल्ड अफरातफर आणि लबाडीचे प्रकरण कायदेशीर मार्गाने न्यायालयात लढण्याऐवजी सरकारवर राजकीय हल्लाबोल करण्याचा पवित्रा काँग्रेस पक्षाने मंगळवारी घेतला.
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड अफरातफर आणि लबाडीचे प्रकरण कायदेशीर मार्गाने न्यायालयात लढण्याऐवजी सरकारवर राजकीय हल्लाबोल करण्याचा पवित्रा काँग्रेस पक्षाने मंगळवारी घेतला. परिणामी, न्यायालयाने काढलेल्या समन्सनुसार येथील महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे आरोपी म्हणून हजर न राहता, ही सरकारने राजकीय सूडभावनेने सुरू केलेली कारवाई असल्याचे आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यायालयाबाहेर केले. हेच सूत्र पकडून काँग्रेस सदस्यांनी आरडाओरड आणि गोंधळ करून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करणे भाग पाडले. भाजपा आणि सरकारने या आरोपांचा इन्कार केला व काँग्रेस नेत्यांनी राजकीय भांडवल करण्याऐवजी न्यायालयापुढे जाऊन आपले निर्दोषित्व सिद्ध करावे, असा प्रतिहल्ला केला.
दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी समन्सविरुद्धची अपिले फेटाळल्यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा केली होती. प्रत्यक्षात असे केले गेले नाही. त्यामुळे सोनिया व राहुल गांधी यांना महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे हजर होणे भाग होते. परंतु सोनिया गांधी लोकसभेत जाऊन बसल्या होत्या व राहुल गांधी सकाळीच पूरग्रस्त पुद्दुचेरीच्या दौऱ्यासाठी रवाना झाले होते.
न्यायालयात काँग्रेसचे प्रवक्ते व ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सोनिया व राहुल गांधींसह इतरही पाच आरोपींना जातीने हजर न राहण्याची आजच्या (मंगळवार) एक दिवसासाठी सूट द्यावी, असा अर्ज केला. तो दंडाधिकाऱ्यांनी मंजूर केला. फक्त आजच्या दिवसासाठी सूट दिली आहे. पुढच्या तारखेला, १९ डिसेंबर रोजी सर्व आरोपींनी न चुकता दु. ३ वाजता हजर रहावे, असे निर्देश दंडाधिकाऱ्यांनी दिले. संसदेत ही बातमी येताच पत्रकारांनी सोनियांना विचारले, निकालाबाबत तुम्ही निराश आहात काय? त्यावर त्वेषाने उसळून सोनिया म्हणाल्या, मी जराही विचलित झालेली नाही’
गेल्या १८ महिन्यांत सूडाच्या राजकारणाला धार चढली आहे. भाजपा देशाला काँग्रेसमुक्त करू पाहात आहे. पण लोकच पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा काँग्रेसला धुमधडाक्यात सत्तेवर आणतील, असा विश्वास पक्षप्रवक्त्यांनी व्यक्त केला.सूरजेवाला म्हणाले की, पूर्वीही जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी या काँग्रेसच्या नेत्यांनी असे व्यक्तिगत हल्ले सोसले आहेत. आताही तेच सुरु आहे.
————————
या प्रकरणाचा सरकारशी काहीही संबंध नाही, असे ठामपणे सांगत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसच्या राजकीय सूडाच्या आरोपाचा इन्कार केला.
> तामिळनाडूत कुड्डालोर येथे पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी आपल्या आईहून अधिक थेट आरोप केला. प्रकरण कोर्टात आहे. संसदेचे अधिवेशन सुरू आहे.
त्यामुळे जे काही बोलायचे ते मी दिल्लीला गेल्यावरच बोलेन, असे सांगून राहुल यांनी सुरुवातीस प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
पत्रकारांनी खूपच तगादा लावल्यावर ते म्हणाले, ‘मला यात सुडाचे राजकारण दिसते. असे करून मला गप्प करता येईल असा त्यांचा (सरकारचा) समज आहे. पण तसे बिलकूल होणार नाही. पूर्वीप्रमाणेच मी सरकारला जाब विचारतच राहीन.’
> ‘‘मी जराही विचलित झालेली नाही’’
संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सोनिया गांधी यांनी काँग्रेस समन्वय समितीची
बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार त्यांना भेटले.
मात्र न्यायालयात जाण्याऐवजी तुम्ही इथे कशा? असे पत्रकारांनी त्यांना विचारले नाही; व सोनिया गांधींनीही न्यायालयात न जाण्याचे कारण स्वत:हून
सांगितले नाही.
त्याऐवजी त्यांनी, ‘मी कशाला निराश होऊ ? मी इंदिराजींची सून आहे. कोणाला घाबरणारी नाही,’ असे ठामपणे सांगितले. सोनियांनी या प्रकरणाला ‘राजकीय सूड’ असे म्हटले नाही. मात्र माध्यमे यातून काय तो अर्थ काढतील, असे त्या म्हणाल्या.