मी निर्दोषच - बाबा रामपाल यांचा कांगावा
By admin | Published: November 20, 2014 11:25 AM2014-11-20T11:25:53+5:302014-11-20T12:51:05+5:30
तब्बल दोन आठवडे भक्तांना पुढे करुन अटक टाळण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणारे बाबा रामपाल यांनी मी निर्दोष असून मी काहीच चुकीचे केेले नाही असा दावा केला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - तब्बल दोन आठवडे भक्तांना पुढे करुन अटक टाळण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणारे बाबा रामपाल यांनी मी निर्दोष असून मी काहीच चुकीचे केेले नाही असा दावा केला आहे. दुसरीकडे हायकोर्टाने बाबा रामपाल यांचा जामीन रद्द करत दुपारी दोन वाजता कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिले असून रामपाल यांच्या भोवती कायद्याचा फास आवळला आहे.
स्वयंघोषित बाबा रामपाल यांना २००६ मधील हत्या प्रकरणी बुधवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी चंदीगडमधील सरकारी रुग्णालयातून बाहेर पडताना रामपाल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली. 'मी निर्दोष असून मी काहीच गैर केले नाही' असा कांगावाही रामपाल यांनी केला आहे. पोलिसांचा विरोध करण्यासाठी रामपाल व त्यांच्या निकटवर्तीयांनी भक्तांना आश्रमात डांबून ठेवल्याचा आरोप होत आहे. रामपाल यांनी हे आरोपही फेटाळून लावले असून मी कोणालाही बंधक बनवले नव्हते असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी सकाळी सरकारी वकिलांनी हरियाणा हायकोर्टाला रामपाल यांना अटक केल्याचे सांगितले. यानंतर न्यायाधीशांनी यापूर्वी रामपाल यांना दिलेला जामीन रद्द केला व त्यांना दुपारी दोन वाजता कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिले.