मी मुस्लीम आहे आणि मला मुस्लीमच राहायचं आहे – हादिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 08:26 PM2018-02-20T20:26:47+5:302018-02-20T20:38:23+5:30
केरळमधील वादग्रस्त लव्ह जिहाद प्रकरणी 25 वर्षीय हादिया उर्फ आखिला अशोकन हिने मंगळवारी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये तिने मी मुस्लीम आहे आणि मुस्लीमच राहणार असल्याचे म्हटले आहे. यासोबत तिने पती शफी जहानबरोबरच राहणार असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली : केरळमधील वादग्रस्त लव्ह जिहाद प्रकरणी 25 वर्षीय हादिया उर्फ आखिला अशोकन हिने मंगळवारी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये तिने मी मुस्लीम आहे आणि मुस्लीमच राहणार असल्याचे म्हटले आहे. यासोबत तिने पती शफी जहानबरोबरच राहणार असल्याचे म्हटले आहे. हादियाने धर्मपरिवर्तन करत शफी जहानशी निकाह केला होता. दरम्यान, याप्रकरणी 22 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टात हादियाने 25 पानांचे प्रतिज्ञापत्र सादर आहे. या प्रतिज्ञापत्रात तिने असे म्हटले आहे की, मी स्वखुशीने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. हा निर्णय कुठल्याही दबावामध्ये घेतलेला नाही. तिने मी मुस्लीम आहे आणि मुस्लीमच राहणार असल्याचे म्हटले आहे. यासोबत तिने पती शफी जहानबरोबरच राहणार असल्याचेही यामध्ये म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने हादियाची वडिलांच्या ताब्यातून मुक्तता करून तिला एका संस्थेच्या हवाली केले होते व तिचे शिक्षण सुरू ठेवण्यास सांगितले होते. गेल्या महिन्यांत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही हादियाच्या निकाहासंदर्भात तपास करण्याचे व कुठलेही बेकायदेशीर कृत्य घडले आहे का याचा तपास करण्याचे आदेश दिले होते.
काय आहे हादिया लव्ह जिहाद प्रकरण?
अखिला अशोकन ऊर्फ हादियाने धर्मपरिवर्तन करत शफीन जहानशी निकाह केला होता. यानंतर हादियाच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेत लग्न रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकेत हादियाचं जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं असून, शफीनचा इसिसशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. केरळ उच्च न्यायालयाने कलम 226 अंतर्गत विवाह रद्द केला होता आणि हादियाला वडिलांकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता. यानंतर शफीनने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाच्या निकालावरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच वडील मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत, असे म्हटले होते.