पुढच्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार व्हायला मी मूर्ख नाही : नितीश कुमार
By admin | Published: May 15, 2017 07:59 PM2017-05-15T19:59:33+5:302017-05-15T20:32:52+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार राहणार नसल्याचं आज स्पष्ट केलं.
Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 15 - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार राहणार नसल्याचं आज स्पष्ट केलं. नरेंद्र मोदींमध्ये जनतेला क्षमता दिसली त्यामुळेच आज ते देशाचे पंतप्रधान आहेत. ज्याची क्षमता लोकं ओळखतील तोच देशाचा पंतप्रधान होईल असंही ते म्हणाले.
आम्ही इतके मूर्ख नाहीत, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नसेल असं पाटणामध्ये "लोक संवाद कार्यक्रमात ते म्हणाले. पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता नितीश म्हणाले, मी 2019 मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. माझा पक्ष खूप लहान असून मला बिहार चालवण्यासाठी जनतेने कौल दिला आहे. ज्याच्यात क्षमता असेल तोच पंतप्रधान बनेल , 5 वर्षांपूर्वी मोदी पंतप्रधान बनतील असा विचार कोणी केला होता का, पण लोकांना त्यांच्यामध्ये क्षमता दिसली म्हणून आज ते पंतप्रधान आहेत, असे त्यांनी नमूद केले. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.
2019 मध्ये भाजपविरोधात बिहारच्या धर्तीवर महाआघाडीची स्थापना करणार का या प्रश्नावर नितीशकुमार म्हणतात, भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. पात्रता आणि क्षमता असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळू शकते. योग्य वेळी त्या उमेदवाराला पुढे आणले जाईल असेही नितीशकुमारांनी स्पष्ट केले.
नितीश कुमारांच्या या स्पष्टीकरणामुळे 2019 च्या लोकसभा निवडणूकीत ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असण्याच्या चर्चांना सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे.