मी राजकारणी नव्हे तर विद्यार्थी
By admin | Published: March 5, 2016 02:49 AM2016-03-05T02:49:12+5:302016-03-05T02:49:12+5:30
राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा किंवा कोणतीही निवडणूक लढविण्याचा माझा उद्देश नाही, असे जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने शुक्रवारी स्पष्ट केले
नवी दिल्ली : राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा किंवा कोणतीही निवडणूक लढविण्याचा माझा उद्देश नाही, असे जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने शुक्रवारी स्पष्ट केले. राजकीय महत्त्वाकांक्षेविषयी तर्कवितर्क सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याने प्रथमच पत्रपरिषदेत बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
फासावर लटकविण्यात आलेला संसद हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू हा भारताचा नागरिक असून त्याच्या मृत्युदंडाबाबत चर्चा होणे कायदेशीर ठरते. तो माझा गुरू किंवा आदर्श नाही. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचा आत्महत्या करणारा विद्यार्थी रोहित वेमुला याला मी आदर्श मानतो. मला भविष्यात शिक्षक बनणे आवडेल. माझ्या राजकीय महत्त्वाकांक्षेविषयी प्रश्न बाजूला सारला जावा. देशातील जनतेने मला निवडून दिलेले नाही. मी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे. देशाचा राष्ट्रपती नाही, असेही तो म्हणाला.(लोकमत न्यूज नेटवर्क)
> २० दिवसानंतर कॅम्पसमध्ये...
देशद्रोहाच्या आरोपाखाली १२ फेब्रुवारी रोजी अटक झाल्यापासून कन्हैया कुमार तिहार कारागृहात होता.
गुरुवारी त्याची मुक्तता होताच कॅम्पसमध्ये जल्लोष झाला. विद्यार्थी मित्रांनी त्याचे जोरदार स्वागत केले. त्याने त्यावेळी विद्यापीठ परिसराबाहेर जवळपास तासभर भाषण दिले होते.