'मी आजही सत्तेत नाही अन् भविष्यातही नसेन, मला फक्त सेवा करायची आहे'; नरेंद्र मोदींची 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 12:26 PM2021-11-28T12:26:13+5:302021-11-28T12:26:19+5:30
नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केले.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी आज 'मन की बात'(Mann Ki Baat) कार्यक्रमात देशाला संबोधित केले. मन की बातचा हा 83वा भाग होता. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि मोबाईल अॅपवर प्रसारित करण्यात आला. यावेळी पीएम मोदींनी आयुष्मान योजनेपासून स्टार्टअप आणि पर्यावरणापर्यंत चर्चा केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी हुतात्म्यांना अभिवादन केले. तसेच, मला सत्तेत नाही तर सेवेत रहायचे आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
मला सत्तेत जाण्यासाठी आशीर्वाद देऊ नका
यावेळी मोदींनी आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी राजेश कुमार प्रजापती यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी त्याच्या फायद्यांबद्दल विचारले, प्रजापती म्हणाले की, मला खूप फायदा झाला आहे. मला नेहमी तुम्हाला सत्तेत पाहायचे आहे. यावर पीएम मोदी म्हणाले की, मला सत्तेत जाण्याचा आशीर्वाद देऊ नका, मी गरिबांच्या सेवेसाठी आहे. मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेत जायचे नाही, मला फक्त सेवेत राहायचे आहे. माझ्यासाठी हे पद केवळ सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी आहे, असे मोदी म्हणाले.
मैं आज भी सत्ता में नहीं हूं और भविष्य में भी सत्ता में जाना नहीं चाहता हूं।
— BJP (@BJP4India) November 28, 2021
मैं सिर्फ सेवा में रहना चाहता हूं। मेरे लिए ये पद, सत्ता के लिए है ही नहीं, सेवा के लिए है।
- पीएम @narendramodi#MannKiBaat
आज भारत स्टार्टअपच्या जगात पुढे आहे
पीएम मोदी पुढे म्हणाले की, आज स्टार्टअपच्या जगात भारत एक प्रकारे आघाडीवर आहे. स्टार्टअप्समध्ये वर्षानुवर्षे विक्रमी गुंतवणूक होत आहे. हे क्षेत्र खूप वेगाने प्रगती करत आहे. देशातील प्रत्येक लहान शहरात स्टार्टअप्सचा आवाका वाढला आहे. तरुणाईने समृद्ध असलेल्या प्रत्येक देशात तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट आहे- कल्पना आणि नाविन्य, दुसरी- जोखीम घेण्याची आवड, तिसरी - कॅन डू स्पिरिट, म्हणजेच कोणतेही काम पूर्ण करण्याचा दृढनिश्चय. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर अभूतपूर्व परिणाम प्राप्त होतात, असे मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यलढ्यात झाशी आणि बुंदेलखंडचे मोठे योगदान आहे
बुंदेलखंड आणि झाशीच्या राणीचे ऑस्ट्रेलियासोबत खास नाते आहे, हाही एक रंजक इतिहास आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध कायदेशीर लढाई लढत होती, तेव्हा त्यांचे वकील जॉन लँग होते. ते मूळचे ऑस्ट्रेलियाचे होते. भारतात राहून त्यांनी राणी लक्ष्मीबाईची केस लढवली होती. आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील झाशी आणि बुंदेलखंडचे योगदान आपल्या सर्वांना माहीत आहे. राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई सारखे वीरही इथेच घडले आणि मेजर ध्यानचंद सारखे खेलरत्नही याच प्रदेशाने देशाला दिले, असेही मोदी म्हणाले.
देशाच्या शहीद जवानांना विनम्र अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दोन दिवसांनंतर डिसेंबर महिना सुरू होत आहे आणि डिसेंबर आला की मानसशास्त्रीयदृष्ट्या आपल्याला वर्ष संपले असे वाटते. या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात आपण नवीन वर्षासाठी आपल्या योजना तयार करत असतो. पण, याच महिन्यात देश नौदल दिन आणि सशस्त्र सेना ध्वज दिन देखील साजरा करतो. आपल्या सर्वांना माहित आहे की 16 डिसेंबर रोजी देश 1971 च्या युद्धाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष देखील साजरे करत आहे. या प्रसंगी मला देशाच्या सुरक्षा दलांची आठवण येते, आपल्या वीरांची आठवण येते. आणि विशेषतः अशा वीरांना जन्म देणार्या शूर मातांची आठवण येते.
देशात अमृत महोत्सवाचा उत्साह
अमृत महोत्सव शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. आता देशभरातील सर्वसामान्य जनता असो की सरकारे असोत, पंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र अमृत महोत्सवाची धामधूम असते आणि या उत्सवाशी संबंधित कार्यक्रम सातत्याने सुरू असतात. असाच एक रंजक कार्यक्रम नुकताच दिल्लीत घडला. 'आझादी की कहानी, मुलांचे भाषण' या कार्यक्रमात मुलांनी स्वातंत्र्यलढ्याशी निगडित कथा पूर्ण भावनेने सादर केल्या. विशेष म्हणजे यात भारतासोबतच नेपाळ, मॉरिशस, टांझानिया, न्यूझीलंड आणि फिजी येथील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता.
PM मोदींनी लघुलेखकाचे केले कौतुक
हिमाचल प्रदेशातील उनाचे लघुलेखक राम कुमार जोशी यांनीही एक अद्भुत काम केले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. राम कुमार जोशी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची अनोखी रेखाचित्रे फक्त टपाल तिकिटांवर बनवली आहेत. हिंदीत लिहिलेल्या 'राम' या शब्दावर त्यांनी रेखाटने तयार केली, त्यात दोन्ही महापुरुषांचे चरित्रही थोडक्यात कोरले आहे.
वृंदावन हे देवाच्या प्रेमाचे प्रत्यक्ष रुप
ते पुढे म्हणाले की, वृंदावनाबद्दल असे म्हटले जाते की ते भगवंताच्या प्रेमाचे प्रत्यक्ष रुप आहे. वृंदावन जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात त्याची छाप तुम्हाला पाहायला मिळेल. पर्थमध्ये 'सेक्रेड इंडिया गॅलरी' नावाची आर्ट गॅलरी आहे. हे गॅलरी स्वान व्हॅलीच्या एका सुंदर परिसरात उभारण्यात आली असून ऑस्ट्रेलियातील रहिवासी जगत तारिणी दासी यांच्या प्रयत्नांचे हे फलित आहे, असेही मोदी म्हणाले.