जनतेपासून दूर राहायला मी काही शहेनशाह नाही - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 05:38 PM2018-07-03T17:38:33+5:302018-07-03T18:14:47+5:30
देशातील जनतेपासून दूर राहायला मी काही शहेनशाह किंवा हुकूमशाह नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
नवी दिल्ली - देशातील जनतेपासून दूर राहायला मी काही शहेनशाह किंवा हुकूमशाह नाही. जनतेचे प्रेम आणि सदिच्छांच्या माध्यमातूनच मला शक्ती मिळते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी त्यांच्या सुरक्षेसंबंधात प्रसिद्ध करणाऱ्या इशाऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज नावाच्या मासिकाला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी मोदींना त्यांच्या सुरक्षेबाबत गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या खबरदारीच्या इशाऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्याला उत्तर देताना मोदी म्हणाले, "जनतेपासून दूर जायला मी काही हुकूमशाह किंवा शहेनशाह नाही. जनतेच्या शुभेच्छा आणि सदिच्छांमधून मला बळ मिळत असले. जेव्हा मी प्रवास करत असतो तेव्हा सर्व वयोगटातील सर्व समाजातील व्यक्ती माझ्या स्वागतासाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले मी पाहतो. अशावेळी मी माझ्या कारमध्ये बसून राहू शकत नाही. म्हणूनच मी त्यांचे स्वागत स्वीकारण्याचा प्रयत्न करतो."
यावेळी भाजपाविरोधात महाआघाडी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विरोधी पक्षांवरही मोदींनी निशाणा साधला. "विरोधी पक्षांची कुठलीही महाआघाडी नाही. तिथे फक्त पंतप्रधानपदासाठी स्पर्धा सुरू आहे. राहुल गांधी म्हणालेत की पंतप्रधान व्हायला तयार आहे, पण त्यांना तृणमूल काँग्रेसचा विरोध आहे. ममताजींना पंतप्रधान व्हायचे आहे, पण त्याला डाव्या पक्षांचा विरोध आहे. तर समाजवादी पक्षाच्या नेत्यांना वाटते की पंतप्रधानपदासाठी इतरांपेक्षा आपणच अधिक योग्य आहोत. या सर्वांचे लक्ष फक्त सत्ता हस्तगत करण्याकडे आहे. जनकल्याणाकडे नाही." असे मोदी म्हणाले.