मी चोर नाही, मी पोलीस जीपमध्ये बसणार नाही - शशिकला
By admin | Published: February 17, 2017 01:34 PM2017-02-17T13:34:19+5:302017-02-17T14:31:28+5:30
पोलीस आपल्याला एखाद्या चोरासारखं जीपमध्ये बसवून नेत असल्याचं पाहून शशिकला यांना धक्काच बसला
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 17 - तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबत पोस गार्डन परिसरातील बंगल्यात ऐशोआरामात दिवस घालवल्यानंतर शशिकला यांना आता पुढील चार वर्ष कारागृहात घालवावी लागणार आहेत. मात्र कारागृहात मिळणारी वागणूक स्विकारण्यास शशिकला तयार नसल्याचं दिसत आहे. कारण बुधवारी जेव्हा शशिकला कारागृहात पोहोचल्या तेव्हा पोलिसांच्या जीपमध्ये बसायला नकार देत 'आपण कोणी चिंधी चोर नाही, पोलीस जीपमध्ये बसणार नाही', असं सांगत चालत घेऊन जाण्याचा आदेशच देऊन टाकला.
पोलीस आपल्याला एखाद्या चोरासारखं जीपमध्ये बसवून नेत असल्याचं पाहून शशिकला यांना धक्काच बसला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस त्यांना जीपमध्ये घेऊन जाणार होते. मात्र शशिकला यांनी यासाठी स्पष्ट नकार दिला.
शशिकला यांनी कारागृह परिसरापर्यंत चालत जाणं पसंद केलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शशिकला यांनी पोलिसांना स्पष्ट सांगितलं की, 'कारागृह कितीही लांब असलं तरी मी चालत येण्यासाठी तयार आहे'.
जयललिता यांना कारागृहात ज्या प्रकारच्या सुविधा मिळायच्या त्या सर्व सुविधा आपल्यालाही मिळतील असं शशिकला यांना वाटतं होतं. याआधी जेव्हा दोघांना दोषी ठरवण्यात आलं होतं, तेव्हा जयललिता मुख्यमंत्री होत्या आणि त्यांची तब्येत खराब होती. त्यामुळे त्यांना अ दर्जाची सुविधा दिली जात आहे. शशिकला यांनाही त्या सुविधा मिळत होत्या. मात्र यावेळी प्रकरण वेगळं आहे. न्यायालयाने शशिकला यांनी कोणतीही विशेष वागणूक देण्यास नकार देत अर्ज फेटाळला आहे. तुम्ही मुख्यमंत्री नसल्याने तुम्हाला काही सुविधा मिळणार नाहीत असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद हाती येता येता राहिलं आणि त्याऐवजी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दोषी आढळल्याने शशिकला यांची कारागृहात रवानगी झाली. नुसता आवाज दिला तरी नोकरांची फौज उभ्या करणा-या शशिकला यांना तुरुंगात एक पंखा, उशी, ब्लँकेट आणि चादर इतकंच काय ते मिळणार आहे. मुख्यमंत्रीपद दुस-यासोबत विभागण्यासही तयार नसणा-या शशिकला यांनी तुरुंगात मात्र दोन अन्य महिला कैद्यांसोबत राहावं लागणार आह. दिवसातून वाचण्यासाठी त्यांना दोन वृत्तपत्रं दिली जाणार आहेत.