"तुझ्या बापाचा नोकर नाहीय"; रात्री मदतीसाठी फोन येताच वरुण गांधी भडकले, वाचा कारण
By हेमंत बावकर | Published: October 20, 2020 09:17 AM2020-10-20T09:17:38+5:302020-10-20T09:30:43+5:30
Varun Gandhi Audio clip viral: समाजवादी पक्षाचे नेते सुनिलसिंह यादव यांनी वरुण गांधी यांच्यावर टीका केली आहे. यादव यांनी ट्विट करून सांगितले की, वरुण गांधी जनतेला सांगत आहेत की, मी तुमच्या बापाचा नोकर नाहीय. वरुणजी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने सांगितले की, सरकार जनतेची सेवक असते शासक नाही.
उत्तर प्रदेश म्हणजे गुन्हेगारांसाठी आंदणच झालेले आहे. गुन्हेगारांनी गुन्हे करायचे आणि राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना वाचवायचे असे समीकरणच बनले आहे. याच उत्तर प्रदेशमधील पीलभीतचे भाजपाचे खासदार वरुण गांधी यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये वरुण गांधी एका व्यक्तीवर भडकले आहेत. त्याने रात्री 10 वाजता मदतीसाठी फोन केला होता. महत्वाचे म्हणजे तो दारूची तस्करी करत होता.
व्हायरल ऑडिओमध्ये एका बाजुने वरुण गांधी बोलत असून दुसरा व्यक्ती ठाणा क्षेत्रात राहणार सर्वेश नावाचा अवैध दारुची विक्री करणारा व्यक्ती आहे. या ऑडिओमध्ये वरुण गांधी सर्वेशवर भडकलेले ऐकायला मिळत आहे. ''मी तुझ्या बापाचा नोकर नाहीय'', अशा शब्दांत गांधी यांनी दारु तस्कराला सुनावले आहे. सर्वेशच्या घरावर रात्री पोलिसांनी छापा मारला होता. त्याच्या घरामध्ये अवैधरित्या दारुचा साठा मिळाला होता. तो घरातून दारू विकत होता.
यानंतर पोलिसांनी कारवाई करत सर्वेशला ताब्यात घेतले. तसेच त्याला सुनगढीच्या आसमरोड पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आले. इथे त्याने पोलिसांना खासदारांना फोन करणार असल्याचे सांगितले. रात्री 10 वाजता सर्वेशने खासदार वरुण गांधी यांना फोन केला. यावेळी वरुण गांधी यांनी त्याला चांगलेच झापले. या प्रकारचा ऑडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. आता हा ऑडिओ पोलिसांनी किंवा सर्वेशने व्हायरल केला की वरुण गांधी यांनी हे कळू शकलेले नाही.
दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते सुनिलसिंह यादव यांनी वरुण गांधी यांच्यावर टीका केली आहे. यादव यांनी ट्विट करून सांगितले की, वरुण गांधी जनतेला सांगत आहेत की, मी तुमच्या बापाचा नोकर नाहीय. वरुणजी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने सांगितले की, सरकार जनतेची सेवक असते शासक नाही. मात्र, सामंतवाद भाजपाची परंपरा आहे. मागास जातीचे लोक तुमच्यासाठी साप- उंदरासारखे आहेत. आता कोण कोणाचा बाप आणि कोण नोकर याचे उत्तर तुम्हाला जनताच देईल, असे म्हटले आहे.
दुसरीकडे ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी वरुण गांधी यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे, तर त्यांची बाजू घेतानाही बरेचजण दिसत आहेत. वरुण गांधी यांनी दारु तस्कराची मदत केली नाही, असे म्हटले आहे. सध्या दारु तस्कर सर्वेशला जामिनावर सोडण्यात आले आहे.