माझ्या मुलाने देशासाठी दिले बलिदान याचा मला अभिमान! काश्मीरमध्ये शहीद कॅप्टन बृजेश थापा यांच्या मात्या-पित्यांचे उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 05:00 AM2024-07-17T05:00:18+5:302024-07-17T05:05:02+5:30
बृजेश यांचे वडील निवृत्त कर्नल भुवनेश थापा यांनी देखील अशाच भावना व्यक्त केल्या. सोमवारी झालेल्या चकमकीतील बृजेश शहीद झाले होते.
जम्मू : माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिले याचा मला अभिमान वाटतो. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे, असे उद्गार शहीद बृजेश थापा यांची आई नीलिमा थापा यांनी मंगळवारी काढले. बृजेश यांचे वडील निवृत्त कर्नल भुवनेश थापा यांनी देखील अशाच भावना व्यक्त केल्या. सोमवारी झालेल्या चकमकीतील बृजेश शहीद झाले होते.
नीलिमा थापा म्हणाल्या की, आम्ही आमचा पुत्र गमावला आहे. तो आता परत येणार नाही. तो अतिशय मनमिळाऊ होता. तू नौदल किंवा हवाई दलात जा असे त्याला आम्ही सांगितले होते; पण त्याला भूदलातच जायचे होते. बृजेश थापा यांचे वडील भुवनेश हे भारतीय लष्करातील निवृत्त कर्नल आहेत. त्यांनी सांगितले की, मुलाला लष्करात जायचे होते. त्याने लहानपणापासून हे स्वप्न उराशी बाळगले होते. त्याने लष्करात जाण्यासाठी सर्व परीक्षा दिल्या व तो पहिल्याच फटक्यात उत्तीर्ण झाला.
‘काही घडलेच नाही हा थाट’
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, शहीद जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गेल्या ३६ दिवसांत काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, जणूकाही घडलेच नाही या थाटात मोदी सरकार वागत आहे.
दहशतवाद निपटून काढणार : सरकार
जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी तीव्र शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, काश्मीरमधून दहशतवाद निपटून काढण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.
महासंचालकांना बडतर्फ करा : मुफ्ती
पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, काश्मीरमध्ये गेल्या ३२ महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांत ५० जवान शहीद झाले. याप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या पोलिस महासंचालकांना बडतर्फ करण्यात यावे.
केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी : राहुल गांधी
चकमकीत चार जवान शहीद झाले त्याबद्दल काँग्रेसने तीव्र शोक व्यक्त केला आहे.
काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत असून सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या त्रुटींची जबाबदारी मोदी सरकारने स्वीकारावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.
त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांविरोधात सरकारने अतिशय कठोर कारवाई केली पाहिजे. भाजपच्या चुकीच्या धोरणांची फळे लष्करातील जवान व त्यांच्या कुटुंबीयांना भोगावी लागत आहेत.