गुजरात निवडणुकीत काँग्रेसचे नुकसान झाल्यास कुठलीही शिक्षा भोगायला मी तयार - मणिशंकर अय्यर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 15:33 IST2017-12-08T15:00:21+5:302017-12-08T15:33:33+5:30
मी केलेल्या वक्तव्याचा गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसला तर पक्ष देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे.

गुजरात निवडणुकीत काँग्रेसचे नुकसान झाल्यास कुठलीही शिक्षा भोगायला मी तयार - मणिशंकर अय्यर
मुंबई - मी केलेल्या वक्तव्याचा गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसला तर पक्ष देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे असे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'नीच' असा उल्लेख केला होता. नरेंद्र मोदी एक नीच आणि असभ्य माणसू आहे असे मणिशंकर अय्यर यांनी म्हटले होते.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला दोन दिवस उरले असताना अय्यर यांनी हे वक्तव्य केले. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. काँग्रेसकडून त्यांच्यावर लगेच निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन नाही - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन करु शकत नसल्याचं म्हणत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त केलं. ते बोललेत की, 'भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षावर टीका करताना नेहमीच असभ्य भाषेचा वापर केला आहे. काँग्रेसची संस्कृती आणि वारसा वेगळा आहे. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांवर टीका करताना वापरलेल्या भाषेचं समर्थन होऊ शकत नाही. मी आणि काँग्रेस पक्ष त्यांनी माफी मागावी अशी अपेक्षा करतो'.
अय्यरांनी मागितली माफी
'नीच म्हणजे खालच्या स्तराचा असं मला म्हणायचं होतं. हिंदी माझी मातृभाषा नसल्याने मी हिंदी बोलताना इंग्लिशचाच विचार करुन बोलतो. जर माझ्या वक्तव्याचा काही दुसरा अर्थ निघाला असेल तर मी माफी मागतो', असं मणिशंकर अय्यर बोलले आहेत.
आधीही काँग्रेसला बसला आहे वादग्रस्त वक्तव्याचा फटका
2016 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी एका प्रचारसभेत वक्तव्य केलं होतं की, सर्जिंकल स्ट्राइक आपल्या जवानांनी केला होता. त्यांच्या रक्तामागे तुम्ही (नरेंद्र मोदी) आहात. तुम्ही त्यांची दलाली करत आहात. दुसरीकडे, 2014 मध्ये सोनिया गांधींनी कर्नाटकमधील प्रचारसभेत नरेंद्र मोदींवर 'विषाची शेती' करण्याचा आरोप केला होता. 2007 मध्येही सोनिया गांधींनी असं एक वक्तव्य केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी मोदींना 'मौत का सौदागर' असं म्हटलं होतं. यामुळे मुस्लमांची मतं आपल्याला मिळतील असा काँग्रेसला विश्वास होता. मात्र ध्रुवीकरणाचा फायदा भाजपाला मिळाला होता.
मणिशंकर अय्यर यांचं मोदींना 'चहावाला' म्हणणं पडलं होत महाग
मणिशंकर अय्यर यांनी 2014 च्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या बैठकीत वक्तव्य केलं होतं की, 'मी तुम्हाला आश्वासन देतो की, नरेंद्र मोदींना देशाचा पंतप्रधान होऊ देणार नाही. पण जर त्यांना चहा विकायचा असेल तर त्यांना जागा शोधून देण्यासाठी मदत करेन'. मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा पुरेपूर फायदा भाजपाने करुन घेतला होता, ज्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला.