NDA च्या बैठकीसाठी गेलेल्या माजी मंत्री बच्चू कडूंनी दिल्लीत केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 01:14 PM2023-07-18T13:14:15+5:302023-07-18T13:14:52+5:30
राष्ट्रीय स्तरावर आम्हाला ताकद दाखवायची असेल तर त्यादृष्टीने आम्ही विचार करू असंही बच्चू कडू म्हणाले.
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत भाजपाप्रणित NDA च्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडत आहेत. यात ३८ पक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यातून महाराष्ट्रातून बच्चू कडू यांचा समावेश आहे. बच्चू कडू या बैठकीला हजर राहणार आहेत. तत्पूर्वी राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून कडू यांनी मोठी घोषणा करत मंत्रिपदावरील दावा सोडला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार इतका लांबला त्यामुळे माझ्या डोक्यात अनेक विचार आले. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. मित्र म्हणून तुम्ही मंत्रिमंडळात हवा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण मित्र म्हणून सोबत आहे. मंत्रिपदापेक्षा दिव्यांग मंत्रालय निर्माण केले हे बच्चू कडूसाठी लाख मोलाचे आहे. मुख्यमंत्र्यांचा आग्रह असला तरी मी मंत्रिपदाचा दावा सोडतोय. २०२४ नंतरची पॉलिसी पाहू. मुख्यमंत्र्यांसमोरील अडचण दूर झाली पाहिजे. मित्राची अडचण होऊ नये यासाठी मंत्रिपदावरील दावा सोडतोय. जर मुख्यमंत्र्यांना देता आले तर आमचे प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांना राज्यमंत्रिपद किंवा एखाद्या समितीचे अध्यक्षपद द्यावे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत आम्हाला एनडीच्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. या बैठकीत जी काही चर्चा होईल त्यावर पुढील निर्णय घेऊ. कुठल्या गोष्टी घेऊन सोबत राहिले पाहिजे यावर चर्चा होईल. मी स्वत: लोकसभा निवडणूक लढलो त्यावेळी ५ हजार मतांनी पडलो. अमरावतीत आमची ताकद आहे. राष्ट्रीय स्तरावर आम्हाला ताकद दाखवायची असेल तर त्यादृष्टीने आम्ही विचार करू. या बैठकीला कोणाला का बोलावले नाही, किंवा मला का बोलावले यावर भाजपच उत्तर देऊ शकेल. या गोष्टीची उकल होत नाही असं बच्चू कडू म्हणाले.
NDA च्या बैठकीत कोणते मुद्दे मांडणार?
ग्रामीण भागात जायचे असेल तर पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी चांगले धोरण आखले पाहिजे. दिव्यांग मंत्रालय राज्यात उभे राहते तसे देशपातळीवर राहायला हवे. त्याचसोबत दिव्यांगांना २०० रुपये भत्ता दिला जातो तो १ हजार पर्यंत वाढवला पाहिजे. पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या निधीचे वाटप समान पद्धतीने करावे. शहरी भागात अडीच लाखापर्यंत दिले जातात, ग्रामीण भागात दीड लाख दिले जाते. त्यात समानता हवी यासारखे विविध मुद्दे NDA च्या बैठकीत मांडणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.