"मी दु:खी मनाने…’’ सभागृहातून अचानक निघून गेले उपराष्ट्रपती धनखड, नेमकं घडलं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 01:46 PM2024-08-08T13:46:43+5:302024-08-08T13:47:35+5:30
Jagdeep Dhankhad News: सभागृहामध्ये दररोज माझा अपमान केला जात आहे. आसनावर ओरडून बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? असा संतप्त सवाल जगदीप धनखड विचारला. (Rajya Sabha) त्यानंतर ते सभापतींच्या आसनावरून उठून निघून गेले.
भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून बाद करण्याच्या निर्णयाविरोधात देशात संतापाची लाट आहे. तसेच त्याचे पडसाद संसदेमध्येही उमटत आहेत. दरम्यान, आज राज्यसभेमध्ये विनेशवरून जोरदार गदारोळ झाला. दरम्यान, हा गदारोळ एवढा वाढला की, सभापती जगदीप धनखड यांना जड अंत:करणानं आसनावरून उठावं लागलं. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्या वर्तनावर ताशेरे ओढले. तसेच सभागृहाच्या नियमानुसार वर्तन करण्यास सांगितले. संतप्त झालेल्या जगदीप धनखड यांनी सांगितले की, सभागृहामध्ये दररोज माझा अपमान केला जात आहे. आसनावर ओरडून बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर ते सभापतींच्या आसनावरून उठून निघून गेले.
त्याचं झालं असं की, विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून बाद करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्ष सभागृहात प्रश्न उपस्थित करू इच्छित होते. मात्र या मुद्द्यावर चर्चा घेण्यास सभापती जगदीप धनखड हे अनुत्सुक होते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन हा मुद्दा सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे सभापती धनखड हे नाराज झाले. त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सभापतींच्या अधिकारांना आव्हान देणं हे असंसदीय असल्याचे खडसावून सांगितले.
याबाबत जगदीप धनखड म्हणाले की, हे माझ्यासाठी आव्हान नाही आहे. तर हे राज्यसभेच्या सभापतिपदासाठी आव्हान आहे. त्यांना वाटतं की, या आसनावर बसलेली व्यक्ती या पदासाठी पात्र नाही आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना न हसण्याची ताकिद दिली. तसेच मी दु:खी मनाने या आसनावरून उठत आहे, असे सांगितले आणि ते निघून गेले.