राज्यातील कोटा पूर्ण झाला, राज्यसभा म्हणजे 'गडचिरोलीला बदली' नाही; 'स्वाभिमानी' राणे समाधानी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 02:09 PM2018-04-03T14:09:57+5:302018-04-03T14:09:57+5:30
मी राज्यातील जवळपास सर्वच पदे भुषविली आहेत. त्यामुळे माझा महाराष्ट्रातील कोटा एकप्रकारे कम्प्लिट झाला आहे.
नवी दिल्ली: माझी राज्यसभेतील खासदारकी म्हणजे गडचिरोतील बदलीची शिक्षा आहे, असा समज कोणीही करून घेऊ नये, असे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी स्पष्ट केले. नारायण राणे आणि कुमार केतकर यांनी मंगळवारी दिल्लीत राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात जास्त रस असूनही तुम्हाला दिल्लीत यावे लागले, याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न यावेळी राणेंना विचारण्यात आला. तेव्हा नारायण राणेंनी म्हटले की, मी राज्यातील जवळपास सर्वच पदे भुषविली आहेत. त्यामुळे माझा महाराष्ट्रातील कोटा एकप्रकारे कम्प्लिट झाला आहे. त्यामुळे आता मला राज्यसभेत काम करायला आवडेल, असे राणेंनी सांगितले.
महाराष्ट्रात नकोशा असलेल्या अधिकाऱ्यांना जशी गडचिरोलीत पोस्टिंग दिली जाते. त्याप्रमाणेच हल्ली राज्यातील नकोशा नेत्यांना दिल्लीत पाठवायचा ट्रेंड आहे. याबद्दल तुम्ही काय वाटते, असा खोचक प्रश्नही राणेंना विचारण्यात आला. त्यावर राणेंनी म्हटले की, माझी दिल्लीतील खासदारकी म्हणजे गडचिरोलीची शिक्षा नव्हे. येथून देशाचा कारभार चालतो. त्यामुळे मी दिल्लीत येण्याबाबत समाधानी आहे, असे राणेंनी सांगितले. तसेच 2019 मध्ये भाजपाला साथ देणार का, याविषयी विचारले असता भाजपासोबत चर्चा करून पुढची रणनीती ठरवू, असेही राणेंनी सांगितले.