मी खूप आनंदी... तेव्हा रडू कोसळलेल्या के.सिवन यांना 'चंद्रयान ३' चा अत्यानंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 08:27 PM2023-08-23T20:27:11+5:302023-08-23T20:28:54+5:30
देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिमेचं मिशन यशस्वी झालं आहे.
नवी दिल्ली - भारताची चंद्रयान ३ मोहिम आज यशस्वी झाली अन् देशभरात एकच जल्लोष झाला. जगभरात विस्तारलेल्या भारतीयांनी मोठ्या अभिमानाने हा क्षण साजरा केला. भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर आज सत्यात उतरला. चंद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही टाळ्या वाजवून आणि तिरंगा फडकवत या क्षणाचा आनंद साजरा केला. यावेळी, अनेकांना चंद्रयान २ मोहिमेच्या अपयशाचीही आठवण झाली. तत्कालीन इस्रोप्रमुख के. सिवन यांनीही या घटनेचे साक्षीदार होत आनंद व्यक्त केला.
देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिमेचं मिशन यशस्वी झालं आहे. चांद्रयान ३ चे आज चंद्रावर सॉफ्ट लँडींग झालं. सायंकाळी ६.०४ वाजता चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि देशवासीयांचा उर अभिमानाने भरुन आला. इस्रोच्या कार्यालयासह देशभरात लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्वांनीच टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. इस्रो कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून दोन्ही हात वर करुन हा क्षण साजरा केला. यावेळी, इस्रोचे प्रमुख सोमनाथन यांनीही आनंद व्यक्त केला. दरम्यान, २०१९ साली भारताच्या चांद्रयान-२ या मोहिमेत अंतिम क्षणी अपयश आल्याने इस्त्रोसह देशवासियांची निराशा झाली होती. मात्र, या अपयशाने खचून न जाता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने प्रयत्न करत चांद्रयान-३ मोहिमेची आखणी केली होती.
२०१९ साली तत्कालीन इस्रोप्रमुख के. सिवन यांच्या नेतृत्त्वात चंद्रयान २ मोहिमेचं काम पूर्ण झालं होतं. मात्र, यावेळी, भारताला अपयश आलं. स्वत: पतप्रधान नरेंद मोदी या प्रक्षेपणावेळी हजर होते. मात्र, ही मोहिम अयशस्वी झाल्याने के. सिवन यांना रडू कोसळले होते. त्यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना जवळ घेत पाठीवर थाप मारली. तसेच, धीर देण्याचा प्रयत्न केला. भारतायांसाठी तोही ऐतिहासिक क्षण ठरला. त्यानंतर, आज चंद्रयान ३ मोहिमेला यश मिळाल्यानंतर स्वत: सिवन यांनी आनंद साजरा केला आहे.
#WATCH | Former ISRO chief, K Sivan congratulates on the successful landing of ISRO's third lunar mission Chandrayaan-3 on the moon
— ANI (@ANI) August 23, 2023
"We are really excited...We have been waiting for this moment for a long time. I am very happy," he says. pic.twitter.com/2VmvQvMuMf
इस्रोच्या तिसर्या चंद्र मोहिमेच्या चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगबद्दल इस्रोचे माजी प्रमुख के. सिवन यांचं अभिनंदन केलं. आज "आम्ही खरोखरच उत्साहित आहोत, या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत आहोत, आज मी खूप आनंदी आहे, असे सिवन यांनी म्हटले. सिवन यांनी चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाचं कौतुक केलंय.
मोदींनीही वाजवल्या टाळ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिक्स परिषदेसाठी द. आफ्रिकेत आहेत. मोदी तेथूनच ह्या क्षणाचे साक्षीदार झाले आणि टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्यानंतर तिरंगा ध्वज फडकावत मोदींनी चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेचा क्षण साजरा केला. देशवासीयांना या मोहिमेच्या यशस्वीतेचा अत्यानंद झाल्याचंही सोशल मीडियातून पाहायला मिळत आहे.