"मी खूप खूश आहे, माझ्या पप्पांनी 41 लोकांचा जीव वाचवला"; रॅट मायनर्सच्या लेकाची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 01:51 PM2023-11-29T13:51:37+5:302023-11-29T13:53:15+5:30
बचाव कार्यात रॅट मायनर्सच्या मेहनतीचं कौतुक होत आहे.
उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेनंतर 17 दिवसांनी 41 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. या संपूर्ण बचाव कार्यात रॅट मायनर्सच्या मेहनतीचं कौतुक होत आहे. रॅट मायनर्सना प्रायव्हेट कंपनी ट्रेंचलेस इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या वतीने बोलवण्यात आलं होतं. दिल्लीमध्ये काही रॅट मायनर्सचं कुटुंब राहतात. त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी 17 दिवस रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आलं.
रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एक वेळ अशी आली जेव्हा सर्व मशीन निकामी झाल्या. तेव्हा मशीन ऐवजी माणसांच्याच मदतीची गरज भासली. 12 रॅट मायनर्सच्या टीमने आपला जीव धोक्यात घालून 41 मजुरांना सुखरूप वाचवलं. आजतकने आरिफ मुन्नाच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. कुटुंबीय सांगतात की, आरिफ मुन्ना 12 दिवसांपूर्वी बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी गेला होता. त्याने आपल्या तीन मुलांना घरी एकटं सोडलं होतं. यावेळी आरिफ मुन्नाच्या भावाने मुलांची काळजी घेतली आहे.
कोरोना महामारीमध्ये आरिफने आपली पत्नी गमावली होती. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, मुन्नाचा स्वभाव हा सर्वांना मदत करण्याचा आहे. त्याने याआधी देखील अनेकांचा जीव वाचवला आहे. नसीमच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला आहे. ज्या दिवशी नसीम बचाव कार्यात सहभागी होण्यासाठी गेला होता, त्याच दिवशी त्याच्या घरी दोन बहिणींचे लग्न होते. पण काम आल्यामुळे तो घरून निघून गेला. आपला मुलगा हिरो बनल्याचा आनंद आता घरच्यांना आहे.
मुन्नाचे काका म्हणतात, आम्ही खूप खूश आहोत. आमच्या घरात सगळे आनंदी आहेत. लोकांची जीव वाचवून चांगलं काम केलं आहे. मुन्नाचा मुलगा म्हणाला, मला खूप आनंद झाला आहे. माझ्या वडिलांनी 41 लोकांचा जीव वाचवला आहे. रशीदने नसीमला फोन केला होता. एक दिवस आधी घरी लग्न होतं. आधी बहिणींची पाठवणी केली. मग मला संध्याकाळी कामासाठी घर सोडावं लागलं. खूप अभिमान वाटतोय. देशवासीय सुखी आहेत, यापेक्षा आनंद काय असू शकतो. देशाच्या सुखातच प्रत्येकाचा आनंद आहे असं म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.