"मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडाच आहे..," पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 06:40 AM2023-06-02T06:40:27+5:302023-06-02T06:41:38+5:30

पंकजा मुंडे यांनी पक्षात झालेल्या कोंडीवर आपली अस्वस्थता दिल्लीत येऊन व्यक्त केली.

"I belong to the BJP; but the BJP is only a little of me..," Pankaja Munde expressed her heartbreak. | "मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडाच आहे..," पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद

"मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडाच आहे..," पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद

googlenewsNext

नवी दिल्ली : ‘मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडीच आहे. काही नाही मिळाले तर मी जाईन ऊस तोडायला,’ अशा स्पष्ट शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पक्षात झालेल्या कोंडीवर आपली अस्वस्थता दिल्लीत येऊन व्यक्त केली.

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिल्लीत बुधवारी सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, तसेच धनगर समाजाचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यव्यग्रतेमुळे सुरुवातीलाच भाषण करून गडकरी निघून गेले. समाजाचा सर्वांगीण विकास करणे हे अहिल्याबाई होळकरांचे जीवन ध्येय होते. त्यांना धनगर समाजापुरते सीमित करू नका. जानकर यांनी समाजातील गरिबी, बेरोजगारी दूर करून समृद्ध आणि संपन्नतेसाठी काय करता 
येईल, याविषयी विचार करावा, असा सल्ला गडकरी यांनी यावेळी बोलताना दिला.  

गडकरी निघून गेल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद जाहीरपणे व्यक्त केली. मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडीच आहे. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण भाजप खूप मोठा पक्ष आहे. आम्ही कोणाला घाबरतच नाही. घाबरणे आमच्या रक्तातच नाही. काही नाही मिळाले तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चारायला, अशा शब्दांत त्यांनी भाजपविषयी रोष व्यक्त केला. महादेव जानकर यांच्यासारखे एक नाही तर हजारो नेते तयार व्हावेत, असे दिवंगत मुंडे साहेबांचे स्वप्न होते, याचे स्मरण पंकजा मुंडे यांनी करून दिले.   

पंकजांची चर्चेत राहिलेली वक्तव्ये...
मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री...!
पंकजा मुंडे मंत्री असताना २०१५ साली त्यांनी पुण्यात भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवात भाषण करताना मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा बोलून दाखवली हाेती.
मला कुठलं पद मिळू नये यासाठी सगळं सुरू आहे का?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्या पक्ष सोडणार का, याबाबत चर्चा सुरू असताना त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून ही खदखद व्यक्त केली हाेती. 
पदासाठी कोणासमोर हात पसरणे रक्तात नाही...!
२०२१ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान नसल्याने हे व्यक्तव्य केले.

महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष तर माझे माहेरच आहे. माझ्या भावाचे ते घर आहे. वडिलांशी भांडण झाले तर भावाच्या घरीही जाऊ शकते. 
पंकजा मुंडे,
भाजप नेत्या

माझी बहीण निश्चित मुख्यमंत्री होईल : जानकर
महादेव जानकर यांनी भाजपवर टीका करताना पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये राहूनही समाजाचे भले करता येणार नाही, अशी भूमिका मांडली. त्या मुख्यमंत्री झाल्या तरी आमच्या बहिणीच्या पक्षामुळे समाजाचे भले होणार नाही. माझी बहीण निश्चित मुख्यमंत्री होईल; पण समाजाचे हित साधले जाणार नाही. कारण रिमोट कंट्रोल वेगळाच असेल. मालक तिसराच असेल, असे जानकर म्हणाले.

Web Title: "I belong to the BJP; but the BJP is only a little of me..," Pankaja Munde expressed her heartbreak.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.