Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 02:08 PM2024-10-07T14:08:38+5:302024-10-07T14:10:14+5:30
Amit Shah : छत्तीसगडमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत १९४ जण मारले गेले, ८०१ जणांनी शस्त्र सोडले आणि ७४२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, असे अमित शाहांनी सांगितले.
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नक्षल प्रभावित राज्यांमधील सुरक्षा आणि विकासाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीनंतर नक्षल भागात अंतिम हल्ला केला जाईल. मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा नायनाट करू. विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा असेल तर नक्षलवाद संपवावा लागेल, असे अमित शाहांनी सांगितले.
नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी नक्षलग्रस्त भागात कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ३० वर्षात पहिल्यांदाच नक्षलवाद्यांकडून मारल्या केलेल्या लोकांची संख्या १०० पेक्षा कमी झाली आहे, असेही अमित शाह म्हणाले. तसेच,नक्षलवाद्यांविरुद्धची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. मार्च २०२६ पर्यंत देशाला या दशकांच्या जुन्या समस्येतून मुक्तता मिळेल. नक्षलवाद्यांचे ८५ टक्के कॅडर संख्या छत्तीसगडपुरते मर्यादित आहे. छत्तीसगडमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत १९४ जण मारले गेले, ८०१ जणांनी शस्त्र सोडले आणि ७४२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, असे अमित शाहांनी सांगितले.
याचबरोबर, नक्षलवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन अमित शाहांनी केले. ते म्हणाले, मी नक्षलवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन करतो. तसेच, आम्ही राज्यांमध्ये राज्य पोलिस आणि संयुक्त कार्यदल स्थापन केले आहे, परंतु आम्हाला त्याच्या श्रेणीबद्धतेवर देखील काम करावे लागेल. आज ६ बीएसएफ आणि ६ हवाई दलाच्या जवानांना वाचवण्यासाठी नक्षलवाद्यांच्या कारवाईसाठी १२ हेलिकॉप्टर तैनात आहेत.
"छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन"
ऑगस्टपासून आतापर्यंत जवळपास १९४ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यामुळे मला छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करायचे आहे, असे अमित शाह म्हणाले. तसेच, जे तरुण अजूनही नक्षलवादाशी संबंधित आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात यावे. नक्षलवादामुळे कोणाचेच भले होणार नाही. तसेच, सरकारी क्षमता वाढीसाठी संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. सुरक्षा संबंधित खर्च (SRE) योजनेच्या बजेटमध्ये जवळपास ३ पटीने वाढ झाली आहे, जी नक्षलग्रस्त भागातील विकास कामांची मुख्य योजना आहे, असेही अमित शाहांनी सांगितले.