Mamata Banerjee : "मी भाजपाला 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देते"; ममता बॅनर्जी कडाडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 04:18 PM2024-03-31T16:18:05+5:302024-03-31T16:27:58+5:30
Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी यांनी भाजपा लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक जागा जिंकण्याच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. तसेच 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देखील दिलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक जागा जिंकण्याच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. तसेच 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देखील दिलं आहे. या राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू होऊ देणार नाही, असंही ममता यांनी म्हटलं आहे. त्यांनी लोकांना सावध केलं की, CAA साठी अर्ज करणारा विदेशी होईल. यासाठी लोकांनी अर्ज करू नयेत, अशी विनंती केली आहे.
तृणमूल काँग्रेस (TMC) सुप्रीमो म्हणाल्या, "भाजपा म्हणतेय '400 पार ', मी त्यांना आधी 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देते. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागा येणार असल्याचं सांगितलं, मात्र त्यांना 77 वरच थांबावं लागलं." या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दुखापतीनंतर त्यांनी आता रॅलीला संबोधित केलं.
"सीएए हे नागरिकांना विदेशी बनवण्याचं जाळं आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्ये सीएए लागू करू देणार नाही" असं म्हटलं आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपासोबत हातमिळवणी" केल्याबद्दल ममतांनी इंडिया आघाडीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) आणि काँग्रेसवर टीका केली आहे.
"पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी नाही. माकपा आणि काँग्रेस भाजपासाठी काम करत आहेत" असं ममता बॅनर्जी यांनी कृष्णानगर येथे टीएमसी उमेदवार महुआ मोईत्रा यांच्या समर्थनार्थ एका निवडणूक रॅलीत म्हटलं आहे. तसेच "आमच्या खासदार महुआ मोईत्रा यांची बदनामी करण्यात आली" असं म्हटलं आहे.