मी कोणत्याही चर्चेस तयार - सुषमा स्वराज
By admin | Published: August 12, 2015 12:22 PM2015-08-12T12:22:01+5:302015-08-12T12:36:30+5:30
मी कोणत्याही चर्चेस तयार असल्याचे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासमोर हात जोडत मल्लिकार्जुन खर्गेंचा तहकूबीचा प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - मी कोणत्याही चर्चेस तयार असल्याचे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासमोर हात जोडत मल्लिकार्जुन खर्गेंचा तहकूबीचा प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती केली. व्यापमं घोटाळा व ललित गेट प्रकरणावरून पावसाळी अधिवेशन वाहून जात असताना अखेरच्या आठवड्यात तरी थोडे कामकाज व्हावे या हेतूने सरकारने या विषयावर चर्चेस तयारी दर्शवली. मात्र, प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून तातडीने या विषयावर चर्चा घेण्याची कॉंग्रेस सदस्यांची मागणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी फेटाळून लावल्याने कॉंग्रेस सदस्यांनी पुन्हा घोषणाबाजीस सुरुवात केली.
बुधवारी सकाळी काँग्रेसने लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. कामकाज सुरू झाल्यावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज तहकुबीचे प्रस्ताव फेटाळून लावले. मात्र परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निवेदन करत मल्लिकार्जुन खर्गेंचा प्रस्ताव स्वीकारून चर्चा सुरू करावी अशी विनंती लोकसभा अध्यक्षांना केली.
सरकारने चर्चेस तयारी दाखविल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभागृहात बोलावण्याची मागणी केली. पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत चर्चा कशी होणार असे विचारत आरोप असलेल्यांनीच खुलासा करणे आम्हाला मंजूर नसल्याचे ते म्हणाले. मात्र प्रश्नोत्तराच्या तासानंतरच चर्चा घेण्यात येईल, असे सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले.
वेंकय्या नायडूंनीही जोडले हात
लोकसभेत गोंधळाचे वातावरण असतानाचा राज्यसभेतही हेच चित्र कायम दिसत असल्याने जीएसटी विधेयक पारित होण्यात अनेक अडचमी येत आहेत. संसदेचे संपूर्ण अधिवेशन गोंधळात वाहून गेल्याने या अधिवेशनात हे विधेयक संमत होण्याची चिन्हे कमी आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वेंकय्या नायडूंनी हात जोडत हे विधेयक मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती विरोधकांना केली. ' काँग्रेससह, डाव्या पक्षांना माझी विनंती आहे ती जीएसटी विधेयक मंजूर करण्यास सहकार्य करावे' असे ते म्हणाले.