सत्तेत असलो तरी संघर्ष विसरलो नाही - रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 06:24 AM2018-05-01T06:24:29+5:302018-05-01T06:24:29+5:30
दलित प्रश्नांवर २ मे रोजी मोर्चा
मुंबई : सत्तेत असलो तरी संघर्ष विसरलो नाही. यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असतानाही नामांतराच्या प्रश्नावर मोर्चा काढला होता. आता केंद्रीय मंत्री असलो तरी दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर मोर्चा काढणार, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. २ मे रोजी मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाइंतर्फे आयोजित मोर्चात सामील होणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंप्रमाणे संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यावरही कारवाई करावी, या हिंसाचाराची प्रत्यक्ष साक्षीदार पूजा सुरेश सकट हिची हत्याच झाली असून तिच्या मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवरील खटले काढून घ्यावे, या मागणीसाठी रिपाइंतर्फे २ मे रोजी राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यावरील मोर्चात रामदास आठवले सहभागी होणार आहेत.
लवकर कायदा करावा
कोरेगाव भीमा हिंसाचारासंदर्भातील मागण्यांसोबतच अॅट्रॉसिटी कायद्याच्या संपूर्ण संरक्षणाची मागणी पक्षाने केली आहे. अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर दलित व आदिवासींवर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला जातो. या प्रकाराला आळा घालण्यात यावा, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लवकर संसदेत कायदा करावा, दलित-अल्पसंख्यांक व महिलांवर अत्याचार करणाºयांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आदी मागण्यांसाठी रिपाइंचा मोर्चा असणार आहे.