मला इंडिया आघाडी हे नाव द्यायचे नव्हते, दुसरे देणार होतो; नितीशकुमारांचा बाहेर पडताच मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 01:41 PM2024-02-17T13:41:01+5:302024-02-17T13:41:30+5:30
पलटीबाज मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारांना बिहारच्या राजकारणात ओळखले जात आहे. अशातच इंडिया आघाडीवर विचारले असता नितीश यांनी आम्ही तर नावही दिले नव्हते, आता इंडिया आघाडीच संपली आहे, असे म्हटले आहे.
बिहारमध्ये राजकीय उलथापालथीनंतर लालू प्रसाद यादवांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांना पुन्हा मैत्रीची ऑफर दिली आहे. यावर नितीश कुमारांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. पलटीबाज मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारांना बिहारच्या राजकारणात ओळखले जात आहे. अशातच इंडिया आघाडीवर विचारले असता नितीश यांनी आम्ही तर नावही दिले नव्हते, आता इंडिया आघाडीच संपली आहे, असे म्हटले आहे.
लालू यांच्या ऑफरवर नितीश यांनी म्हटले की, कोण काय बोलतो त्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही आता एकत्र आलो आहोत, जसे पहिले होतो. जो घोटाळा झालाय त्याची चौकशी होईल. गोष्टी ठीक सुरु नव्हत्या. यामुळे मी राजदला सोडले, असे नितीशकुमार म्हणाले.
लालू प्रसादांना नमस्कार केल्यावरून ते म्हणाले की, आता मला असे कोणी भेटले, मग तो माझ्या विरोधात असो वा विरोधी पक्षात, आम्ही नमस्कार करतो. बरोबर? ही माझी सवय आहे. आम्ही इथे होतो तेव्हा लालू समोरून येत होते, म्हणून नमस्कार केला, असा खुलासा नितीश कुमार यांनी केला.
इंडिया आघाडीबद्दल विचारले असता, मी खूप प्रयत्न केला होता. मी हे नावही दिले नव्हते, मला दुसरे नाव द्यायचे होते. त्या लोकांनीच इंडिया आघाडी हे नाव दिले. हे लोक सुरुवातीला नाराज होत होते म्हणून मी म्हटले की सोडून द्या तुम्हाला जे नाव द्यायचे ते द्या. मी जेव्हा वेगळा झालो तेव्हाच मी सगळे सांगितले होते. बिहारच्या हिताचे काम करणे हे माझे काम आहे, असे नितीशकुमार म्हणाले.