"मला काल रात्रभर झोप लागली नाही"; ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांना काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 02:45 PM2024-09-14T14:45:39+5:302024-09-14T14:50:14+5:30

Mamata Banerjee News : कोलकातामधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. 

"I didn't sleep all night last night"; What did Mamata Banerjee say to the protesting doctors? | "मला काल रात्रभर झोप लागली नाही"; ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांना काय म्हणाल्या?

"मला काल रात्रभर झोप लागली नाही"; ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांना काय म्हणाल्या?

Mamata Banerjee Latest News : कोलकातामधील आरजी कर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरची हत्या करण्यात आली. या घटनेविरोधात गेल्या ३३ दिवसांपासून डॉक्टर आंदोलन करत आहेत. या डॉक्टरांची शनिवारी (१४ सप्टेंबर) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलकांना मला थोडा वेळ द्या अशी विनंती केली. 

ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांना म्हणाल्या, "तुमच्या आंदोलनाला मी सलाम करते. मी पण एक विद्यार्थी नेता होते. शुक्रवारी (१३ सप्टेंबर) प्रचंड पाऊस झाला. तुम्ही झोपू शकला नाहीत. मलाही झोप लागली नाही. ३३ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे."

"माझी नाही, तुमचे पद मोठे आहे" 

आंदोलक डॉक्टरांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "जेव्हा तुम्ही झोपता, त्यावेळी आम्ही जागत असतो. माझे पद मोठे नाही, तुमचे पद मोठे आहे. मला शुक्रवारी (१३ सप्टेंबर) रात्रभर झोप लागली नाही, कारण तुम्ही सगळे इतक्या मुसळधार पावसात आंदोलन करत आहात. तुम्ही खूप त्रास सहन केला आहे. आंदोलन संपवण्याची तुमची इच्छा असेल, तर मी माझ्या अधिकाऱ्यांशी बोलते आणि तुमच्या मागण्यांचा अभ्यास करते."

"तुमच्या सगळ्या मागण्यांवर विचार करेन"

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांशी बोलताना असेही म्हणाल्या की, "मी तुमच्या सगळ्या मागण्यांवर विचार करेन. मी सीबीआयला सांगेन की, आरोपीला फाशी द्या. तुम्ही कामावर परत येत असाल, तर मी वचन देते की, मी तुमच्या मागण्यांचा अभ्यास करेन. तुमच्या मागण्यांवर विचार करेन. मी तुम्हाला विनंती करते की, मला थोडा वेळ द्या."

कोलकातामधील आरजी कर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. याविरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणाचा तपास न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी संजय रॉय नावाच्या व्यक्तीला अटक केलेली आहे. 

Web Title: "I didn't sleep all night last night"; What did Mamata Banerjee say to the protesting doctors?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.