राफेल प्रकरणात माझ्यावर कुठलाच आरोप नाही; मोदींचं राहुल गांधींना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 07:30 PM2019-01-01T19:30:56+5:302019-01-01T19:40:45+5:30
राफेल करारावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
नवी दिल्ली- राफेल करारावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही राफेल करारावरून मोदींना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात मोदी सरकारला क्लीन चिट दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही काँग्रेसनं राफेल करारातील भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती.
तसेच सर्वोच्च न्यायालयाला मोदी सरकार फसवत आहेत. खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांनी न्यायालयालाचीच नव्हे तर १३० कोटी जनतेचीही फसवणूक केली आहे. देशातील नागरिकाचा कररूपी पैसा केंद्र सरकार कोणत्या पद्धतीने खर्च करत आहे, याची मागणी सरकारने देणे आवश्यक असल्याचंही काँग्रेस म्हणालं होतं.
त्यानंतर मोदींनी राफेल करारावर प्रतिक्रिया दिली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी खुलासा केला आहे. राफेल प्रकरणात माझ्यावर झालेले आरोप खासगी स्वरूपाचे नव्हते. जे आरोप झाले ते सरकारवर केले होते. संसदेत राफेल करारावर आम्ही उत्तर दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयानंही या प्रकरणात उत्तर दिलं आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतींनीही उत्तर दिलं आहे. तसेच भारताच्या पंतप्रधानांनीही आता उत्तर दिलं आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांना जशाच तसं उत्तर दिलं आहे.