मला फटकारण्याची कोणात हिंमत नाही - शत्रुघ्न सिन्हा
By admin | Published: November 18, 2015 11:53 AM2015-11-18T11:53:39+5:302015-11-18T12:02:43+5:30
स्वार्थी व हितसंबंध जपणारी मंडळी बिहारमधील निवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा शिकलेले नाहीत असे सांगत भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पक्षनेतृत्वावर टीका केली आहे.
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १८ - स्वार्थी व हितसंबंध जपणारी मंडळी बिहारमधील निवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा शिकलेले नाहीत असे सांगत भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पक्षनेतृत्वावर टीका केली आहे. माझ्यावर निशाणा साधण्याची कोणात हिंमतही नाही किंवा डीएनएही नाही असे सांगत त्यांनी मोदींनाही चिमटा काढला आहे.
बिहार निवडणुकीपासून भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा हे भाजपावर नाराज असल्याचे वृत्त होते. बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाल्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. पराभवाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, पराभवाची कारणे सांगायला हवी व पक्षाच्या ज्येष्ठ नेते आणि संस्थापकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर दिले पाहिजे असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. बिहारमधील पराभवानंतरही बोध घेतलेला नाही, अजूनही चुकीच्या माहितीच्या आधारे गैरसमज निर्माण केले जात आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. बिहारी मर्द व माजी गृहसचिव आर के सिंह हे खरे बोलले, आम्हाला फटकारण्याची कोणाची हिंमत नाही किंवा त्यांचा डिएनएही नाही असे सिन्हा यांनी नमूद केले. ही वेळ आहे प्रतिक्रिया देण्याची, माफी मागण्याची व वरिष्ठांना संतुष्ट करण्याची असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.