‘यापुढे आय बेग म्हणण्याची गरज नाही’ - एम. व्यंकया नायडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:17 AM2017-12-16T01:17:21+5:302017-12-16T01:19:24+5:30
सभागृहात कागदपत्रे सादर करताना कोणत्याही सदस्याने व मंत्र्यांनी यापुढे ‘मी परवानगी घेतो’ (आय बेग टू) असा शब्दप्रयोग करू नये, असे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकया नायडू यांनी शुक्रवारी म्हटले.
नवी दिल्ली : सभागृहात कागदपत्रे सादर करताना कोणत्याही सदस्याने व मंत्र्यांनी यापुढे ‘मी परवानगी घेतो’ (आय बेग टू) असा शब्दप्रयोग करू नये, असे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकया नायडू यांनी शुक्रवारी म्हटले.
सभापती झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दिवस होता. सदस्य व मंत्र्यांनी म्हणायचे आहे ते एवढेच की, यादीतील कागदपत्रे मी सभागृहात मांडण्यासाठी उभा राहतो, असे सांगून नायडू म्हणाले की, परवानगी घ्यायची गरज नाही. हा स्वतंत्र भारत देश आहे.
मंत्र्यांना त्यांच्याकडील कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आल्यावर मंत्र्यांनी आजच्या कामकाजाच्या सुधारित यादीनुसार माझ्या नावापुढे असलेली कागदपत्रे सादर करण्याची परवानगी मी मागतो (आय बेग टू ले आॅन द टेबल द पेपर्स लिस्टेड अगेन्स्ट माय नेम) अशा शब्दांत सुरुवात करताच नायडू यांनी वरील निरीक्षण नोंदवले. नायडू यांनी लगेचच खुलासा केला की, ही केवळ सूचना आहे, आदेश नाही.
विरोधकांनी केला निषेध
-‘पाकिस्तानसोबतचा कट’ या शब्दप्रयोगाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करून क्षमा मागावी ही राज्यसभेत विरोधकांनी शुक्रवारी दिलेली नोटीस फेटाळल्याचा निषेध केला.
मोदी यांनी जे वक्तव्य केले त्याचा संबंध माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी
होता.
सभागृहाबाहेर वार्ताहरांशी बोलताना विरोधकांनी सांगितले की, मोदी यांचे ते वक्तव्य दुर्दैवी होते व नोटिसीवर चर्चा करण्यास अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी दिलेला नकार निराश करणारा होता.
विरोधी नेत्यांनी जनता दलाचे (संयुक्त) बंडखोर नेते शरद यादव व अली अन्वर अन्सारी यांना राज्यसभा सदस्यपदासाठी अपात्र ठरवण्याच्या निर्णयालाही आक्षेप घेतला.