माझा भुतकाळ जाणून देशाला माझ्याप्रती सहानुभूती वाटावी अशी माझी इच्छा नाही - मनमोहन सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 10:32 PM2017-12-02T22:32:41+5:302017-12-02T22:37:23+5:30
माझा भुतकाळ जाणून देशाला माझ्याप्रती सहानुभूती वाटावी अशी माझी इच्छा नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कोणतीही स्पर्धा करण्याची माझी इच्छा नाही असा टोला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लगावला आहे.
सुरत - माझा भुतकाळ जाणून देशाला माझ्याप्रती सहानुभूती वाटावी अशी माझी इच्छा नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कोणतीही स्पर्धा करण्याची माझी इच्छा नाही असा टोला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लगावला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पोहोचलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं मनमोहन सिंग यांनी यावेळी म्हटलं. बँकांबाहेर रांगेत उभं राहून मृत्यूमुखी पडलेल्या 100 लोकांच्या मृत्यूचं मला दु:ख असल्याचंही मनमोहन सिंग यांनी यावेळी सांगितलं.
मनमोहन सिंग यांनी सांगितलं की, '8 नोव्हेंबर हा भारतीय अर्थव्यवस्था तसंच लोकशाहीसाठी काळा दिवस होता. मी पुर्ण दु:ख आणि जबाबदारीने हे बोलत आहेत. रांगेत उभ्या राहून आपला जीव गमावणा-या 100 लोकांच्या मृत्यूमुळे मी व्यथित आहे'. यावेळी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटलं की, पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार पटेल यांच्याशी तुलना करुन मोदीजी काहीच मिळवून शकणार नाहीयेत.
'जुलै सप्टेंबर तिमाहीत जीडीपीत झालेल्या 6.3 टक्के वाढीमुळे देशातील आर्थिक मंदीचं रुपडं पालटलं आहे असं म्हणणं जरा घाईचं होईल. कारण यामध्ये मध्यम आणि छोट्या क्षेत्रातील आकडेवारीचा उल्लेख नाही. ज्यांना नोटाबंदी आणि घाईघाईत लागू कऱण्यात आलेल्या जीएसटीमुळे मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे', असं मनमोहन सिंग म्हणाले आहेत. त्यांनी जुलै-सप्टेंबर तिमाहीत झालेल्या 6.3 टक्के वाढीचं त्यांनी स्वागत केलं, मात्र यासोबत अर्थव्यवस्थेत सुधार झाल्याचा निष्कर्ष काढणं घाईचं होईल अशी चेतावणीही दिली.
मनमोहन सिंग यांनी नोटाबंदी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेद्र मोदी लोकांना प्रभावित करण्यासाठी आणि मतं मिळवण्यासाठी अजून चांगले मार्ग शोधतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.