माझ्या नावावर घर नाही; पण लाखो मुलींना घरमालक बनवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 09:39 AM2023-09-28T09:39:36+5:302023-09-28T09:40:07+5:30
पंतप्रधान मोदी : गुजरातमध्ये ५,००० कोटींच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ; रोबोटने पंतप्रधानांना दिला चहा...
बोडेली (गुजरात) : आपल्या नावावर घर नाही; पण आमच्या सरकारने देशातील लाखो मुलींना घरमालक बनवले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. ते दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर मंगळवारी पोहोचले.
राज्यातील आदिवासीबहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोडेली शहरात शिक्षण क्षेत्राशी संबंधित ४,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांसह ५,००० कोटींहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी ते लोकांना संबोधित करत होते. ते म्हणाले की, मला गरीब लोकांच्या समस्या माहीत आहेत आणि मी नेहमीच त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आज मी समाधानी आहे. कारण माझ्या सरकारने देशभरातील लोकांसाठी चार कोटी घरे बांधली आहेत. आदिवासी, अनुसूचित जाती आणि मागास समाजातील कोट्यवधी महिला आता लखपती झाल्या आहेत. कारण त्यांच्याकडे सरकारी योजनांतर्गत उभारलेली घरे आहेत.
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा हे गांधीनगर येथील गुजरात शिक्षण विभागाच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरने इतके प्रभावित झाले की, त्यांनी देशभरात अशी केंद्रे सुरू करण्याचा आग्रह केला असल्याचेही मोदींनी सांगितले. कोणाचेही नाव न घेता मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल करत ते आरक्षणाचे राजकारण करत असल्याचे सांगितले.
२० वर्षांपूर्वी त्यांनी ‘व्हायब्रंट गुजरात’चे बीज पेरले होते आणि आज ते मोठे झाड झाले आहे. २०१४ मध्ये जेव्हा माझ्याकडे देशाची सूत्रे सोपवण्यात आली, तेव्हा भारताला जागतिक विकासाचे इंजिन बनवणे हे माझे ध्येय होते. आतापासून काही वर्षांत, तुमच्या डोळ्यांसमोर भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल, ही माझी हमी आहे. - पंतप्रधान मोदी
भारत लवकरच जगातील आर्थिक
महासत्ता म्हणून उदयास येईल : पंतप्रधान
भारताला जागतिक विकासाचे इंजिन बनवणे हे आपले ध्येय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. देश लवकरच जगातील आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल, असा दावाही त्यांनी केला.
गुजरातमधील भाजप सरकारने अंबाजी ते उमरगामपर्यंतच्या संपूर्ण आदिवासी भागात पाच वैद्यकीय महाविद्यालये, दोन विद्यापीठे आणि २५ हजार नवीन वर्गखोल्या तयार केल्या आहेत, असे मोदी म्हणाले.
महिला आरक्षण विधेयक विरोधक तीन दशकांपासून रोखले
n विरोधी पक्षांनी महिला आरक्षण विधेयक तीन दशकांपासून रोखून धरले आणि विधेयक मंजूर झाले असताना ते जात आणि धर्माच्या आधारावर महिलांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला.
n भाजपने बडोदा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. नवलाखी मैदानावर हजारो महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.