आघाडी-युतीची गरज दुबळ्यांना- नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 03:54 PM2018-02-24T15:54:01+5:302018-02-24T15:54:01+5:30
आगामी निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नगराध्यक्षांसह १७ नगरसेवक बहुमताने निवडून येतील.
काँग्रेस सोडून स्वत:चा स्वतंत्र पक्ष थाटलेल्या नारायण राणे हे लवकरच कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने होमपीचवर पहिल्यांदाच परीक्षेला समोर जात आहेत. राणे यांनी शनिवारी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष कणकवली नगरपंचायतीची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी आघाडी-युतीची गरज दुबळ्यांना असते, असे सांगत स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. आगामी निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नगराध्यक्षांसह १७ नगरसेवक बहुमताने निवडून येतील, असा दावा राणे यांनी केला.
काँग्रेसला रामराम करून स्वत:चा पक्ष स्थापन केलेले राणे सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबणीवर पडत असल्याने राणे सध्या अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश असेल, असे सूचक वक्तव्य राणे यांनी केले होते. परंतु त्यानंतरही सत्ताधारी भाजपाच्या गोटातून राणेंना मंत्रिमंडळात सामावून घेण्याच्यादृष्टीने फारशा हालचाली झाल्या नव्हत्या.