"मला पूर्ण विश्वास आहे की.."; हैदराबादेत टी. राजाला तिकीट देताच भडकले ओवैसी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 01:30 PM2023-10-23T13:30:49+5:302023-10-23T13:33:25+5:30
प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार टी राजा सिंह यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे
देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आता प्रचाराने वेग घेतला आहे. त्यासोबतच प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणाही होत आहे. तेलंगणात भाजपला काँग्रेससह केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीचं आव्हान आहे. तसेच, एआयएमआयएमच्या असदुद्दीन औवेसी यांच्यासोबतही लढत द्यावी लागणार आहे. त्यामुळे, भाजपानेहैदराबादमधून पुन्हा एकदा हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या टी. राजा यांना उमेदवारी दिली आहे. टी. राजा यांच्या उमेदवारीवरुन असदुद्दीन औवेसी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार टी राजा सिंह यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. ते पुन्हा गोशामहल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तसेच, तेलंगणाचे आयटी मंत्री आणि सीएम केसीआर यांचे पुत्र केटीआर, यांच्या विरोधात भाजपने सिरिल्ला मतदारसंघातून राणी रुद्रमा रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. टी. राजा यांना उमेदवारी दिल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त करत भाजपला लक्ष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा संबंधितांना पुरस्कार दिला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, नुपूर शर्मालाही निश्चितच बक्षीस दिलं जाईल, असे ओवैसी यांनी म्हटलं आहे.
.@narendramodi has rewarded his dear “fringe element.” Quite sure that Nupur Sharma will also get her blessings from the PM. Hate speech is the fastest way to a promotion in Modi’s BJP https://t.co/Qky6RlObH8
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) October 22, 2023
द्वेष पसरवणारे भाषणं करणाऱ्यांना मोदींच्या भाजपाकडून लवकरात लवकर प्रमोशन दिलं जातं. मोदींनी आपल्या प्रियजनांना प्रमोशन दिलं आहे, मला पूर्णपणे विश्वास आहे की, नुपूर शर्मालाही बक्षीस दिलं जाईल, असे ओवैसी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.
दरम्यान, टी. राजा हे हैदराबादमधील भाजपाचा हिंदुत्त्ववादी चेहरा असून हिंदूत्व आणि वादग्रस्त विधानांसाठी ते कायम चर्चेत असतात. यापूर्वी, भाजपाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांचं पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबन केलं होतं. मात्र, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते निलंबन मागे घेण्यात आलं आहे.
भाजपाचे तीन खासदार विधानसभेच्या रिंगणात
भारतीय जनता पक्षाने तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने पहिल्या यादीत एकूण ५२ उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे, मध्य प्रदेश-राजस्थानप्रमाणे पक्षाने तेंलगणातही भाजपच्या तीन खासदारांना उमेदवारी दिली आहे. करीमनगरमधून खा. बंदी संजय कुमार निवडणूक लढवतील. तर, एटाला राजेंद्र यांना हुजूराबाद आणि गजवेल, या दोन जागांवर उमेदवारी देण्यात आली आहे.