... "तेव्हा मी मुंडन करुन अयोध्येतून पळाले होते"; उमा भारतींनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 07:14 PM2024-01-06T19:14:31+5:302024-01-06T19:45:25+5:30
२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीतील प्राणप्रतिष्ठा सोहहळ्याची चर्चा आहे. अयोध्येत २२ जानेवारी रोजी हा भव्य-दिव्य सोहळा होत असून देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. यानिमित्ताने रामजन्मभूमी आंदोलनात सहभाग घेतलेल्या, रामजन्मभूमीत आंदोलनासाठी अयोध्येत जाऊन कारसेवा केलेल्या बहुतांश कारसेवकांना अयोध्येचं निमंत्रण दिलं जात आहे. अयोध्येतील या कारसेवेत मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनीही योगदान दिलं होतं. त्याच, अनुषंगाने त्यांनी कारसेवेतील काही आठवणी जागवल्या आहेत.
२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात, रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी असलेल्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपा नेत्या उमा भारती यांचाही आंदोलनात सक्रीय सहभाग होता. विशेष म्हणजे या आंदोलनातील सहभागावेळी आपण शहीद होतो की काय, असे प्रसंगही तीनवेळा घडल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मला रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र येथून फोन आला होता, तुम्ही २२ ऐवजी १८ जानेवारीलाच अयोध्येला या. त्यामुळे, मी अयोध्येत १८ जानेवारीपासूनच असणार आहे. मी १२ वर्षांची असल्यापासून या दिवसाची वाट पाहात होते. रामचंद्रास परमहंस यांनी मला ही जागा दाखवली होती. तेव्हा, बंद कुलूपात रामलला होते, केवळ पुजेसाठी ते कुलूप उघडले जात. हिंदू समाजाचा हा केवढा अपमान आहे, अशी भावना त्यावेळी माझ्या मनी होती.
तेव्हापासूनच मी रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झाले आहे. पहिल्यांदा जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा आम्ही बांधाच्या तुरुंगात होतो. आमच्यासोबत मिश्रा, वसुंधरा आणि मेहता हेही होते. एका गेस्ट हाऊसला तुरुंगाचा दर्जा देऊन आम्हाला तेथे ठेवले होते. मात्र, मी डोक्याचं मुंडन करुन, वेश बदलून तेथून पळून गेले होते, अशी आठवण आणि रामजन्मभूमी आंदोलनातील आपला सहभाग उमा भारती यांनी स्पष्ट केला.
२ नोव्हेंबर रोजीची कारसेवा सर्वात विशेष मानली जाते. त्यावेळी, एका समुहाचं नेतृत्त्व मला दिले होते, आमच्या सर्वांवर भीषण लाठीचार्ज झाला होता, गोळीबारही करण्यात आला होता. ज्यामध्ये, प्रा. अरोडा आणि राम व शरद कोठारी यांचा मृत्यू झाला होता. या कारसेवेत मोठा हिंसाचार झाला होता. एक धाडसाचं आणि शालिनतेचं प्रदर्शन होतं. त्यानंतर, ६ डिसेंबर रोजीची कारसेवा घडली. त्या आंदोलनातही मी सहभागी होते, अशी आठवण सांगताना ६ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेचा वृत्तांतही उमा भारती यांनी सांगितला. तसेच, यावेळी मी या आंदोलनात मृत्यूमुखी पडते, किंवा शहीद होते की काय, असेही वाटल्याचं त्यांनी सांगितलं.