माझ्याजवळ दारूगोळा आणि बंदूक आहे : आमदाराचे वादग्रस्त विधान
By admin | Published: March 24, 2016 01:53 AM2016-03-24T01:53:28+5:302016-03-24T01:53:28+5:30
संयुक्त जनता दलाचे आमदार (संजद) नीरजकुमार ऊर्फ गोपाल मंडल यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून आपल्या पक्षाच्या सरकारला अडचणीत आणले आहे.
पुन्हा हत्येचे राजकारण करणार!
एस. पी. सिन्हा, पाटणा
संयुक्त जनता दलाचे आमदार (संजद) नीरजकुमार ऊर्फ गोपाल मंडल यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून आपल्या पक्षाच्या सरकारला अडचणीत आणले आहे. ‘आता मला पुन्हा हत्येचे राजकारण सुरू करावे लागेल,’ असे भागलपूरच्या गोपालपूरचे आमदार मंडल यांनी म्हटले आहे.
नवगछियाच्या बाल भारती विद्यालयात रविवारी आयोजित कवी संमेलनात मंडल बोलत होते. विरोधकांना धमकावताना मंडल म्हणाले, ‘माझ्याजवळ दारूगोळा आणि बंदूक आहे. मी तुमचे संरक्षण करणार. येथील लोकांना मी केवळ संरक्षण देऊ शकतो. संरक्षणासाठी हत्या करावी लागली तरी चालेल. मी हत्येचे राजकारण सोडून आलो आहे. पण गरज पडली तर पुन्हा हत्येचे राजकारण करेल. बिहारमध्ये दारूबंदी लागू होऊ शकत नाही. दारू नसेल तर होळीत मन तरी कसे डोलणार?’
मंडल यांनी भागलपूरचे खासदार शैलेश कुमार मंडल यांच्यावरही टिप्पणी केली. ‘मी एखाद्या कार्यक्रमाला जातो, तेव्हा खासदारांची वाट पाहतो. परंतु ते मात्र आधीच पोहोचतात आणि माझी वाट न पाहता कार्यक्रमाचे उद्घाटन करून मोकळे होतात. नंतर सांगतात की ही माझी स्टाईल आहे,’ असे मंडल म्हणाले.
गेल्या २८ फेब्रुवारी रोजी मंडल यांनी विरोधकांना अशीच धमकी दिलेली होती. ‘माझा एक पाय जेलमध्ये आणि दुसरा बाहेर असतो. जेलमध्ये गेलो म्हणूनच नेता बनलो. माझ्या कार्यकर्त्यांसोबत जो कुणी जातीभेद करेल आणि बोट दाखवेल, त्याचा मी हात छाटून टाकीन. कुणी जर शिवी दिली तर त्याची जीभ कापेल,’ असे ते म्हणाले होते.दरम्यान संजदचे नगरसेवक राणा गंगेश्वर यांनीही वादग्रस्त विधान केले आहे.
समस्तीपूर येथे बिहार दिवस कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘राष्ट्रगीत हे गुलामगिरीचे प्रतीक आहे.’ यावर उपस्थित लोक भडकले, तेव्हा गंगेश्वर शांत झाले.
दरम्यान संजदने आ. मंडल आणि गंगेश्वर या दोघांनाही पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाध्यक्ष शरद यादव यांनी या दोघांच्या निलंबन कारवाईवर शिक्कामोर्तब केले.