लाेकसभा लवकर होणार हे मी ८ महिन्यांपासून सांगतोय, ममतांच्या बोलण्याला नितीशकुमारांचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 07:09 AM2023-08-30T07:09:22+5:302023-08-30T07:40:01+5:30
बिहारमध्ये सुरू असलेल्या जात गणनेबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नवे प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुका लवकर होण्याची शंका व्यक्त केली होती. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही त्यांचे विधान उचलून धरत मागील ७-८ महिन्यांपासून आपणही तेच सांगत होतो, असे म्हटले आहे.
जदयूचे सर्वोच्च नेते नितीश कुमार यांनी अलीकडेच दावा केला होता की, विरोधी आघाडी ‘इंडिया’मध्ये आणखी पक्ष सामील होऊ शकतात. तथापि, त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही. परंतु ते म्हणाले की “भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न आहे”.
बिहारमध्ये सुरू असलेल्या जात गणनेबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नवे प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. याबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी नालंदा येथे सांगितले की, आम्ही राज्याच्या हितासाठीच काम करत आहोत, नाही का? त्याचे मूल्यमापन करण्यात अर्थ आहे. आम्ही चांगले काम करत आहोत, त्यामुळे अनेकांचा आक्षेप आहे. आम्ही काय मोठे काम करणार आहोत हे सर्वांनाच माहीत आहे, असे ते म्हणाले.
मला पदाची इच्छा नाही
- नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आपल्याला कोणत्याही पदाची इच्छा नसल्याचा पुनरुच्चार केला.
- दुसरीकडे, लोकसभेच्या निवडणुका वेळेआधी घेण्याच्या शक्यतेवर म्हणाले की, ते गेल्या ७-८ महिन्यांपासून म्हणत आहेत की निवडणुका कधीही होऊ शकतात.
- त्यामुळेच विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून आता त्याची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे.