मी तुम्हाला नमस्कार करायला आलोय; मोदींनी घेतली इस्रोच्या वैज्ञानिकांची गळाभेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 08:07 AM2023-08-26T08:07:47+5:302023-08-26T08:18:01+5:30
Narendra Modi in ISRO: बंगळुरुमध्ये भाजपाने त्यांच्या स्वागताची पुरेपूर तयारी करून ठेवली होती. सकाळी सहा वाजता मोदींचे विमान बंगळुरूच्या विमानतळावर उतरले.
चंद्रयान ३ मोहिमेवरून जगभरात इस्रोची वाहवा होत आहे. चंद्रयान २ वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात होते. बंगळुरूच्या इस्रोच्या कार्यालयात लाईव्ह पाहत होते. परंतू, तेव्हा चंद्रयान २ चे लँडिंग अपयशी झाले होते. यंदा मोदी ब्रिक्स शिखर बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेला होते. यामुळे ते चंद्रयान ३ मोहिमेच्या यशावेळी उपस्थित राहू शकले नव्हते. या दौऱ्यावरून मोदी आज भारतात परतले. परंतू, त्यांनी दिल्लीला न जाता थेट बंगळुरू गाठले.
बंगळुरुमध्ये भाजपाने त्यांच्या स्वागताची पुरेपूर तयारी करून ठेवली होती. सकाळी सहा वाजता मोदींचे विमान बंगळुरूच्या विमानतळावर उतरले. यानंतर मोदींनी तिथे स्वागतासाठी जमलेल्या लोकांना संबोधित केले. पंतप्रधानांनी जय जवान, जय किसान, जय अनुसंधाचा नारा दिला. येथून पंतप्रधान मोदी इस्रोच्या मुख्यालयात पोहोचतील आणि चांद्रयान-३ पाठवणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमला भेटण्यासाठी निघाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची भेट घेतली आणि चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केले. इस्रोच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींना चांद्रयान-3 मोहिमेची माहिती देण्यात आली. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी पंतप्रधान मोदींना संपूर्ण मिशनची माहिती दिली.
चांद्रयान-३ च्या लँडिंगवेळी मी दक्षिण आफ्रिकेत होतो. पण माझे मन पूर्णपणे तुमच्या यशाकडे होते. मी तुम्हाला नमस्कार करायला आलो आहे. मला तुम्हा सर्वांना बघायचे होते. मी तुम्हा सर्वांना सलाम करू इच्छितो, असे पंतप्रधान मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांना म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी भावूक झाले होते.
आज तुम्हा सर्वांमध्ये असल्याने मला एक वेगळाच आनंद वाटत आहे. कदाचित असा आनंद फार क्वचित प्रसंगी मिळतो. 23 ऑगस्टचा प्रत्येक सेकंद माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा फिरत आहे. इस्रो केंद्रावर आणि देशभरात ज्या प्रकारे लोकांनी आनंदाने उड्या मारल्या ते दृश्य कोण विसरू शकेल. काही आठवणी अजरामर होतात. तो क्षण अजरामर झाला. तो क्षण या शतकातील सर्वात प्रेरणादायी क्षणांपैकी एक आहे. प्रत्येक भारतीयाला आपलाच विजय वाटत होता. आजही शुभेच्छा, संदेश दिले जात आहेत. हे सर्व तुम्हीच शक्य केले आहे, असे मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना म्हणाले.
चंद्राच्या ज्या भागावर चंद्रयान उतरले आहे त्या भागाचे नाव भारताने ठरवले आहे. ज्या ठिकाणी लँडर उतरले आहे, तो बिंदू शिवशक्ती म्हणून ओळखला जाईल, असे मोदी म्हणाले.