मी इंदिरा गांधींचांही सामना केला आहे, आता कोणालाच घाबरत नाही - शरद यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 08:51 AM2017-08-12T08:51:30+5:302017-08-12T08:57:08+5:30
शरद यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जेडीयूमधील काही नेते करत असल्याच्या वृत्तावर बोलताना, आपण माजी पंतप्रधान इंदिर गांधींच्या विरोधातही उभे राहिलो होतो, आणि आता कोणालाच घाबरत नाही असं सांगितलं आहे.
मुझफ्फरपुर, दि. 12 - जेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी आपल्याविरोधात कारवाई करण्याची दिलेली धमकी फेटाळून लावली आहे. बिहारमधील महाआघाडी तोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने शरद यादव मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज आहेत. आपली ही नाराजी त्यांनी उघड केली असून, नितीश कुमार यांच्यावर टीकाही केली आहे. दरम्यान शरद यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जेडीयूमधील काही नेते करत असल्याच्या वृत्तावर बोलताना, आपण माजी पंतप्रधान इंदिर गांधींच्या विरोधातही उभे राहिलो होतो, आणि आता कोणालाच घाबरत नाही असं सांगितलं आहे.
जेडीयूचे संसदीय नेते शरद यादव यांनी सांगितलं की, 'काही नेता मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी इंदिरा गांधींचाही न घाबरता सामना केला आहे. मग मला घाबरवणारे हे कोण ?. नितीश कुमार यांच्या निर्णयाविरोधात आपली नाराजी आणि विरोध लोकांसमोर मांडण्यासाठी शरद यादव यांनी राज्यात संवाद यात्रा काढली असून लोकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
शरद यादव यांनी यावेळी आपल्यामध्ये आणि नितीश कुमार यांच्यात पुन्हा सगळं नीट होण्याची कोणतीच शक्यता नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नितीश कुमार यांचा भाजपासोबत जाण्याचा निर्णय अयोग्य ठरवत लोकांचा विश्वासघात केल्याचा आरोप याआधीच शरद यादव यांनी केला आहे. गुरुवारी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, 'मी महाआघाडीसोबत आहे. सरकारी जेडीयू नितीश कुमार यांच्यासोबत असली तर खरा पक्ष माझ्या बाजूने आहे'.
नितीश कुमार आणि त्यांच्या समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचाराचं समर्थन केलं जाऊ शकत नाही असं सागत महाआघाडीतून माघार घेतली असल्याचा दावा केला आहे. यावर बोलताना शरद यादव यांनी सांगितलं की, 'मी अनेकदा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला आहे. मग तो 2जी घोटाळा असो किंवा राष्ट्रमंडळ घोटाळा, हवाला असो किंवा आसाराम बापू प्रकरण असो'. 'जेव्हा लालूप्रसाद यादव भ्रष्टाचाराच्या आरोपात जेलमध्ये गेले होते, तेव्हा कोणत्या परिस्थितीत त्यांच्याशी हातमिळवणी केली होती', असा सवालही शरद यादव यांनी यावेळी विचारला.