मी सिसोदियांविरोधात काही बोललो नाहीय; सीबीआयच्या आरोपांवर कोर्टातच केजरीवालांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 03:14 PM2024-06-26T15:14:32+5:302024-06-26T15:14:49+5:30
पुढचे दोन-तीन दिवस पहा सीबीआयचे सूत्र या प्रसारमाध्यमांत काय काय प्लॅन करतात, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.
दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी काही थांबायचे नाव घेत नाहीत. आज भर कोर्टातच सीबीआयने केजरीवालांना अटक केली आहे. खालच्या कोर्टात जामीन मिळाला परंतू हायकोर्टाने जामीन रद्द केला, सर्वोच्च न्यायालयाने काहीच दिलासा न दिलेल्या केजरीवालांनी आपले अंग या घोटाळ्यातून काढून घेण्यासाठी मनीष सिसोदियांवर सारे आरोप ढकलल्याचा दावा सीबीआयने केला आहे. हा दावा केजरीवाल यांनी फेटाळून लावला आहे.
कोर्टाला केजरीवालांनी सांगितले की, प्रसारमाध्यमांमध्ये काहीतरी चालू आहे, जे योग्य नाहीय. मनिष सिसोदिया दोषी आहेत असे मी कोणतेच वक्तव्य केलेले नाही. मी म्हटले होते की ते निर्दोष आहेत, मी देखील निर्दोष आहे. यांचा उद्देशच आम्हाला प्रसारमाध्यमांद्वारे बदनाम करण्याचा आहे. मी त्यांना काल हे चुकीचे आरोप आहेत असे म्हटले होते. आता पुढचे दोन-तीन दिवस पहा सीबीआयचे सूत्र या प्रसारमाध्यमांत काय काय प्लॅन करतात, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.
सीबीआय आपल्या अटकेच्या अधिकाराचा गैरवापर करत आहे. यातून सीबीआयची भावना चुकीची असल्याचे समोर येते, असा आरोप केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी केला. यावर सीबीआयने सांगितले की, हायकोर्टाने केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिल्यानंतरच आम्ही ही अटक केली.
सिसोदियांबद्दल काय म्हणाले केजरीवाल?
16 मार्च 2021 रोजी एका दारू व्यावसायिकाशी संपर्क साधण्यात आला होता. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दारू धोरणाबाबत त्यांची भेट घेतली. केजरीवाल यांनी 16 मार्च रोजी सचिवालयात मागुंता रेड्डी यांची पहिल्यांदा भेट घेतली. ते खासदार आणि दक्षिणेतील मोठे नाव आहे. त्यांनी केजरीवाल यांची भेट घेऊन दिल्लीच्या दारू धोरणाबाबत पाठिंबा मागितला. यावर केजरीवाल यांनी मदतीचे आश्वासन दिले मात्र आम आदमी पक्षाला निधीही देण्यास सांगितले. रेड्डी यांना के. कविता यांच्याशी बोलण्यास सांगितले होते. 19 मार्च 2021 रोजी कविताने रेड्डी यांच्याशी संपर्क साधला आणि तिला हैदराबादमध्ये भेटण्यास सांगितले. हैदराबादमध्ये कविताने रेड्डी यांच्याकडे 50 कोटी रुपयांची मागणी केली होती.
विजय नायर यांनी आपल्यासोबत काम केले नाही तर त्यांनी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्या हाताखाली काम केले, असे केजरीवालांनी सांगितल्याचा दावा सीबीआयने केला आहे. केजरीवाल यांनी दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाची संपूर्ण जबाबदारी मनीष सिसोदिया यांच्यावर टाकल्याचा सीबीआयचा दावा आहे. उत्पादन शुल्क धोरणाची कल्पना त्यांची नसून मनीष सिसोदिया यांची असल्याचे केजरीवाल म्हणाले.