Wait and Watch! शिंदे गटाच्या खासदाराचा भयंकर व्हिडिओ...; संजय राऊतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 11:58 AM2024-02-05T11:58:01+5:302024-02-05T11:59:20+5:30

महाराष्ट्र भाजपाला कधी माफ करणार नाही. आज तुमची सत्ता आहे पण जेव्हा सत्ता जाईल तेव्हा लोक रस्त्यावर तुम्हाला तुडवतील असा इशारा राऊतांनी भाजपाला दिला. 

I have received a terrible video of a Shinde group MP. Sanjay Raut targets CM Eknath Shinde and BJP | Wait and Watch! शिंदे गटाच्या खासदाराचा भयंकर व्हिडिओ...; संजय राऊतांचा मोठा दावा

Wait and Watch! शिंदे गटाच्या खासदाराचा भयंकर व्हिडिओ...; संजय राऊतांचा मोठा दावा

नवी दिल्ली -  Sanjay Raut on Eknath Shinde ( Marathi News ) आत्ताच माझ्याकडे एका महाराष्ट्रातील खासदाराचा भयंकर असा व्हिडिओ आला आहे. शिंदे गटाचेच ते खासदार आहेत. परदेशात गेले होते. सतत परदेशात जात असतात. का जातात ते आता हळूहळू बाहेर येईल.  त्यांचा खर्च कोण करतंय हे सर्व बाहेर येईल. इतकेच नाही तर भविष्यात तुम्ही पाहा. काय होणार आणि काय नाही. शिंदे गटाचे खरे चरित्र्य काय हे जनतेसमोर येईल आणि एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच जाहीर करतील, आमचा यांच्याशी काही संबंध नाही. आमची चूक झाली.  Wait and Watch...असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करत शिंदे गटाला इशारा दिला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, बाळराजेंच्या वाढदिवसाला गुंडाची फौजच होती. मी एकच छायाचित्र प्रसिद्ध केले आणखी बरेच आहेत. पण हे महाशय कोण आहेत, त्यांची कर्तबगारी काय हे पुणे पोलिसांनी जाहीर करावे. या लोकांवर बाळराजेंनी भविष्यातील निवडणुकींसाठी काय जबाबदारी दिलीय? आपल्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी, हे सर्व गुंड कोण गोळा करतंय? यासाठी एका माजी पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केलीय. या गुंडाचे संघटन करण्यासाठी, मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यातून या गुंड टोळ्यांचं नियंत्रण होतंय. जेलमधून गुंडांना जामीनावर बाहेर काढलं जाते. चार्जशीट दाखल न करत जामीनाचा मार्ग मोकळा केला जातो. ही सर्व यादी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर राज्यात कायद्याचे राज्य यावं असं वाटत असेल तर ते गृहमंत्री म्हणून काम करतील. एकनाथ शिंदे यांच्या दहशतीखाली ते आहेत का? महाराष्ट्राला गुंडगिरीचा डाग लागतोय. महाराष्ट्र कलंकित होतंय त्यात फडणवीस योगदान देतायेत का हे सांगावे असा सवाल राऊतांनी विचारला. 

तसेच श्रीकांत शिंदे महाराष्ट्राचे बाळराजे आहेत. बाळराजेंचा वाढदिवस राज्यभरात साजरा झाला. त्यांना शिवसेनेचे खासदार केले. एकनाथ शिंदे यांनी नव्हे तर उद्धव ठाकरेंनी केला. खासदार होण्याआधी त्यांची ओळख नव्हती. ते हाडवैद्य होते, त्यांना खासदार बनवलं. बाळराजे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्याने राज्यभरात त्यांचा वाढदिवस झाला, आमच्या शुभेच्छा आहेत. पण या राज्यातील गुंडगिरी का वाढते? गुंडगिरीला कोणाचा राजाश्रय आहे? एक आमदार त्यांच्याच मतदारसंघात पोलीस स्टेशनला जाऊन गोळी चालवतात, तेदेखील बाळराजेंच्या खास माणसावर, एका उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पुण्यात कुख्यात गुंडाच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतायेत असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

दरम्यान, माझे कोट्यवधी रुपये हे शिंदेंना दिलेले आहेत. माझ्या माहितीनुसार, हा आकडा १०० कोटीहून अधिक आहे. गेल्या १० वर्षात ही रक्कम त्यांच्याकडे पोहचली आहे. याचा शोध ईडीने घेतला पाहिजे. गुन्हेगारी माध्यमातून मिळालेला पैसा हा एकनाथ शिंदेंकडे असेल. तर पीएमएलए कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. या कायद्याला पुरावा लागत नाही. आम्हाला अशाच प्रकारच्या जबाबावर अटक झाली आहे. जबाब हाच पुरावा असतो. पीएमएलए कायद्यात एखाद्याच्या जबाबावर व्यक्तीला अटक होते. गणपत गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत. सत्ताधारी पक्षाचे आहेत. ते सांगतायेत कोट्यवधी रुपये मी एकनाथ शिंदेंना दिलेत आणि त्यांच्याकडे ते आहेत. हा पुरावा आहे. मग ईडी कुठे, आर्थिक गुन्हे शाखा, सीबीआय आणि गृह मंत्रालय कुठे आहे?. FIR झाल्याशिवाय ईडी हस्तक्षेप करत नाही. गणपत गायकवाड प्रकरणी एफआयआर झाली आहे. त्या एफआयआरचा वापर करून ईडी गुन्हा नोंदवू शकते. एकनाथ शिंदेंकडे हिशोब मागावा. किरीट सोमय्यांकडून हिंमत असेल तर वर्षा बंगल्यावर जाऊन हिशोब माग. भाजपानं ही बदमाशी बंद करावी असंही संजय राऊत म्हणाले. 

महाराष्ट्र भाजपाला माफ करणार नाही

जे अमित शाह शिंदेंना तुरुंगात टाकायला निघाले होते त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत असं एकनाथ शिंदे म्हणतात. जर शिवसेना नसती, बाळासाहेब ठाकरे नसते, उद्धव ठाकरे नसते तर तुम्ही आम्ही कोण आहोत?. शरद पवार नसते तर अजित पवार कोण असते? माणसानं इतकं कृतघ्ज्ञ असू नये. आता तुम्ही रामनामाचे गोडवे गाताय त्यांच्याकडून आधी कृतज्ञता शिका. मग मोदींचे गोडवे गा, मोदी आम्हाला ओळखतात म्हणता, मोदींना आम्ही जास्त ओळखतो. अजित पवारांचे कालचे विधान महाराष्ट्रातील जनसामान्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारं आहे. राजकारणात कुटुंबातील व्यक्ती अशाप्रकारे वागू शकतात तेही सत्तेसाठी, फायद्यासाठी जे काल राज्याने पाहिले. हे विष घराघरात, मनामनात पेरण्याचं काम भाजपानं केले. त्यामुळे महाराष्ट्र भाजपाला कधी माफ करणार नाही. आज तुमची सत्ता आहे पण जेव्हा सत्ता जाईल तेव्हा लोक रस्त्यावर तुम्हाला तुडवतील असा इशारा राऊतांनी भाजपाला दिला. 

Web Title: I have received a terrible video of a Shinde group MP. Sanjay Raut targets CM Eknath Shinde and BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.