"मी प्राध्यापकांच्या घरात २० मिनिटे लपून राहिले"; PMO कार्यालयाने मागवला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 07:58 AM2023-11-04T07:58:47+5:302023-11-04T07:59:13+5:30
पंतप्रधान कार्यालयाने या घटनेबाबत अहवाल मागविला आहे
वाराणसी (उत्तर प्रदेश) : बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) आयआयटीच्या विद्यार्थिनीचा कथित विनयभंग आणि तिला विवस्त्र करून व्हिडीओ बनविल्याच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळपासून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन रात्री उशिरा संपले. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने या घटनेबाबत अहवाल मागविला आहे. पीडित विद्यार्थिनीने नोंदवलेल्या एफआयआरचा तपशीलही समोर आला आहे.
आयआयटीच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही विद्यार्थी आंदोलन थांबविण्यास तयार नव्हते. रात्री उशिरा आयआयटीचे संचालक व पोलिस प्रशासनासोबतच्या दीर्घ बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले. दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन विद्यापीठाने दिले आहे.
एफआयआरमध्ये काय?
त्यांनी माझे तोंड घट्ट बंद केले आणि मला एका कोपऱ्यात नेले, जबरदस्तीने माझे चुंबन घेतले, कपडे काढले आणि फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले. मी मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली. १०-१५ मिनिटांनी त्यांनी मला सोडले. मी माझ्या हॉस्टेलच्या दिशेने धावले तेव्हा मला मोटरसायकलचा आवाज आला. त्यानंतर मी एका प्राध्यापकांच्या घरात २० मिनिटे लपून राहिले. त्यानंतर प्राध्यापकांनी मला सुरक्षा अधिकाऱ्यांकडे नेले.