मी IIT इंजिनिअर, EVM मध्ये घोळ करायच्या 10 पद्धती सांगेल:केजरीवाल
By admin | Published: April 14, 2017 08:37 PM2017-04-14T20:37:59+5:302017-04-14T22:05:36+5:30
इव्हिएम मशिनबाबत गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा उघडणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा इव्हिएम मशिनसोबत छेडछाड करता येऊ शकते असं म्हटलं
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.14 - इव्हिएम मशिनबाबत गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा उघडणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा इव्हिएम मशिनमध्ये घोळ करता येऊ शकतो असं म्हटलं आहे. मी IIT इंजिनिअर आहे आणि इव्हिएम मशिनमध्ये घोळ करण्याच्या 10 पद्धती सांगू शकतो असं केजरीवाल म्हणाले. याशिवाय दिल्लीची जनता दिल्ली सरकारच्या कामगिरीवर आनंदी असून राजौरी गार्डन येथे झालेल्या पोटनिवडणुकीला एमसीडी निवडणुकांचा ट्रेलर समजू नये असं म्हटलं आहे.
न्यूज चॅनल NDTV ला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल म्हणाले, दिल्लीमध्ये शिक्षण, आरोग्य, विज आणि पाण्यासंबंधी अनेक कामं करण्यात आली आहेत आणि सरकारने केलेल्या कामांबद्दल दिल्लीची जनता खूष आहे. राजौरी गार्डन पोटनिवडणुकीच्या पराभवाला त्यांनी, जरनल सिंह यांनी पंजाब निवडणुकात घेतलेली उडी कारणीभूत ठरल्याचं सांगितलं. त्यांनी येथे खूप कामं केली पण पंजाबमध्ये जाण्याने जनता नाराज झाली होती आणि त्याचाच परिणाम निवडणुकांमध्ये दिसला, असं ते म्हणाले.
निवडणूक आयोग भाजपाला मदत करत असून आयोगावर विश्वास ठेवावा असं एकही पाऊल त्यांनी उचललेलं नाही असं केजरीवाल म्हणाले. इव्हिएम हॅक करण्याच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या आव्हानावर बोलताना ते म्हणाले, मी IIT इंजिनिअर आहे आणि इव्हिएम मशिनमध्ये घोळ करण्याच्या 10 पद्धती सांगू शकतो.
याशिवाय जाहिरातींवर केलेल्या खर्चाचा तपशील जर मला मागितला जात असेल तर सर्व मुख्यमंत्र्यांकडून हा तपशील मागवावा असं ते म्हणाले.