"राष्ट्रसेवेसाठी समर्पित जीवन, व्यंकय्या नायडू यांच्याकडून मी बरेच काही शिकलोय"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 10:37 AM2024-07-01T10:37:52+5:302024-07-01T10:38:18+5:30

व्यंकय्या गारू आणि माझा अनेक दशकांपासूनचा परिचय आहे. आम्ही एकत्र काम केले आहे आणि मी त्यांच्याकडून बरेच शिकलो आहे. त्यांच्या आयुष्यात जर एखादी गोष्ट नेहमीच कायम राहिली असेल, तर ती म्हणजे लोकांविषयीचे प्रेम.

"I learned a lot from Venkaiah Naidu, a life dedicated to national service" - Narendra modi | "राष्ट्रसेवेसाठी समर्पित जीवन, व्यंकय्या नायडू यांच्याकडून मी बरेच काही शिकलोय"

"राष्ट्रसेवेसाठी समर्पित जीवन, व्यंकय्या नायडू यांच्याकडून मी बरेच काही शिकलोय"

नरेंद्र मोदी
पंतप्रधान

भारताचे माजी उपराष्ट्रपती आणि आदरणीय नेते एम. व्यंकय्या नायडू गारू आज ७५ वर्षांचे होत आहेत. मी त्यांना दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. ज्या नेत्याचा जीवनप्रवास समर्पण आणि जनतेच्या सेवेप्रती अविचल बांधिलकीचे दर्शन घडवतो, अशा नेत्याचा सन्मान करण्याचा हा प्रसंग आहे. राजकीय क्षेत्रातील त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून ते उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्या कार्यकाळापर्यंत, व्यंकय्या गारू यांची कारकीर्द भारतीय राजकारणातील गुंतागुंतींना सहजतेने व विनम्रतेने हाताळण्याच्या त्यांच्या असामान्य क्षमतेचा दाखला देते. त्यांचे वक्तृत्व, विद्वत्ता व विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने असलेला भर यामुळे त्यांना सर्वच पक्षांकडून आदर प्राप्त झाला आहे.

आंध्र प्रदेशातील विद्यार्थी राजकारणातील एक विद्यार्थी नेते म्हणून सक्रीय झाल्यावर विविध प्रश्नांवर सक्रीय राहण्याची त्यांची वाटचाल सुरू झाली आणि राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. त्यांची प्रतिभा, वक्तृत्व आणि संघटनात्मक कौशल्ये लक्षात घेता, कोणत्याही राजकीय पक्षात त्यांचे स्वागतच झाले असते, परंतु ते 'राष्ट्र प्रथम' या दृष्टिकोनातून प्रेरित असल्याने त्यांनी संघ परिवारासोबत काम करण्यास प्राधान्य दिले. रा. स्व.संघ, अभाविपसोबत काम केले आणि त्यानंतर त्यांनी जनसंघ आणि भाजपाला बळकट केले.

ज्यांनी व्यंकय्या गारू यांना बोलतांना ऐकले असेल त्यांना त्यांच्या वक्तृत्वकौशल्याचा प्रभाव जाणवला असेल. ते शब्दप्रभू आहेतच, तितकेच ते कार्यप्रभूही आहेत. युवा आमदार असल्यापासून त्यांनी लोकांच्या समस्यांना आवाज दिला. एनटीआर यांच्यासारखे दिग्गजही प्रभावीत होते आणि त्यांनासुद्धा व्यंकय्या त्यांच्या पक्षात यावेत असे वाटत होते, मात्र मूळ विचारधारेपासून व्यंकय्या गारू यांनी  विचलित होण्यास नकार दिला. आंध्र प्रदेशात भाजपाला बळकट करण्यात, पक्षाला गावोगावी पोहोचवण्यात व सर्व स्तरातील लोकांना सामावून घेण्यात मोठी भूमिका बजावली.

१९९० मध्ये भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने व्यंकय्या गारुंच्या प्रयत्नांची दखल घेतली आणि १९९३ मध्ये पक्षाच्या अखिल भारतीय सरचिटणीस पदावर त्यांची नेमणूक केली  त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या वाटचालीचा प्रारंभ झाला. एक किशोरवयीन, जो एके काळी अटलजी व अडवाणीजींच्या दौऱ्यांच्या घोषणा करत लोकांना माहिती देत फिरत असायचा, त्यांच्यासोबत आता थेट काम करण्याची संधी देणारा हा क्षण त्या व्यक्तीच्या आयुष्यातील खरोखरच एक उल्लेखनीय क्षण होता.

सरचिटणीस म्हणून आपल्या पक्षाला सत्तेवर कसे आणता येईल आणि देशाला भाजपाचा पहिला पंतप्रधान मिळेल यावर त्यांचा भर होता. दिल्लीमध्ये प्रवेश झाल्यावर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही आणि त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यापर्यंत त्यांनी आगेकूच केली. त्यानंतर त्यांनी केंद्रात मंत्रिपदेही यशस्वीपणे सांभाळली आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार कोणीच नव्हता.  मंत्रीपद व खासदारकीचा राजीनामा देतानाचे त्यांचे भाषण कधीच विसरू शकत नाही.

उपराष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळल्यानंतरही  व्यंकय्या गारू हे सार्वजनिक जीवनात  सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांचे जिव्हाळ्याचे विषय तसेच देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींबाबत ते मला फोन करतात आणि त्याविषयी जाणून घेतात. आमचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यावर मी त्यांना भेटलो. ते आनंदित झाले. . त्यांच्या या कारकिर्दीसाठी त्यांना पुनश्च शुभेच्छा देतो.  मला आशा आहे की युवा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व सेवेची आवड असलेले सर्वजण त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन ती मूल्ये आत्मसात करतील. त्यांच्यासारखे लोकच आपल्या देशाला अधिक चांगले आणि चैतन्यशील बनवतात.

 

Web Title: "I learned a lot from Venkaiah Naidu, a life dedicated to national service" - Narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.