आईचे संस्कारधन: संकटाला टक्कर देणं आईकडूनच शिकलो!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 06:35 AM2022-07-27T06:35:21+5:302022-07-27T06:36:05+5:30
शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, बांधकाम अशा निरनिराळ्या समित्यांची सदस्यपदं आणि अध्यक्षपदं त्यांनी नुसतीच भूषवली नाहीत
शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री
माझ्या आईचा जन्मच मुळी सामाजिक न्यायाचा वसा घेऊन राज्यकारभार करणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानातला, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला! तिथलं वातावरण स्त्री-शिक्षणाला पोषक. यामुळे बाईंचा पिंड पक्का सुधारणावादी आणि शिक्षणाला महत्त्व देणारा. उत्तम शिक्षणाचा बाईंचा हट्टाग्रह पक्क्या जाणिवेतून आल्यामुळे त्यात तोंडदेखलेपणा नव्हता. त्यासाठीच्या खस्तांकरता त्या सदैव तयार असायच्या. त्याचा त्यांनी कधीच बाऊ केला नाही. मुलं योग्य प्रकारे शिकताहेत ना, त्यांची प्रगती व्यवस्थित सुरू आहे ना, यासाठी वेळोवेळी शिक्षकांकडे त्या विचारपूस करत. काय कमी-जास्त आहे, याची माहिती घे, त्यानुसार त्या त्या गोष्टींची तजवीज करणं हेही त्यांचं सुरूच असायचं.
शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, बांधकाम अशा निरनिराळ्या समित्यांची सदस्यपदं आणि अध्यक्षपदं त्यांनी नुसतीच भूषवली नाहीत, तर त्यावर आपली छापही पाडली. बाईंनी कोणतीही कौटुंबिक कारणं देत कधीही कुठलीही बैठक चुकवली नाही. २००४चं वर्ष माझ्यासाठी आयुष्यात समरप्रसंगासारखं आलं. मला कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. संघर्ष करणं हा माझा पिंड आहे. संकटांना न कचरता टक्कर द्यायची, या माझ्या स्वभाववैशिष्ट्यामुळे मी कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली. कर्करोगाचं निदान झाल्यावर माझी पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया होती, ‘आपण कर्करोगाबरोबर दोन हात करायचे. जिंकायचंच!’
माझ्यातला लढण्याचा हा गुण आईचा. कोणत्याही शारीरिक त्रासावर मात करून ती भक्कमपणे उभी राहायची. मी तिला कधीच डगमगलेली पाहिलेलं नाही. एक आठवण सांगतो. आमच्या गावात एक सोडलेला वळू होता आणि त्याचा लोकांना त्रास होत असल्याने कुणीतरी त्याला दोन-चार गोळ्या घातल्या. गोळ्या घातल्यावर हा वळू घायाळ होऊन एका कोपऱ्यात पडला. पहाटे उठल्यावर माझ्या आईच्या तो नजरेस पडला. त्याच्या अंगातून रक्त येत असल्याचं पाहून तिनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तसं करताच तो जखमी वळू उसळून उठला आणि आईला जोरदार ढुशी देऊन त्यानं तिला खाली पाडलं. पुढे पंधरा मिनिटं तो आईला धडका देत होता. त्यात तिच्या एका मांडीच्या हाडाचा चुरा झाला. तिला दवाखान्यात दाखल केल्यावर एका पायाचं जवळपास सहा इंच हाड काढून टाकावं लागलं. शस्त्रक्रियेतून ती उठली; पण त्यानंतर पुढचं सारं आयुष्य कुबड्या घेतल्याशिवाय ती कधी चालू शकली नाही. एवढ्या मोठ्या अपघातातून उठल्यावरही त्या माऊलीनं दुखण्याचा कोणताही बाऊ केला नाही. आम्हा अकरा भावंडांवर असणारी तिची बारीक नजर तसूभरही कमी झाली नाही. तिनं आपली सगळी कर्तव्यं चोख बजावली. माझ्या इच्छाशक्तीचा जन्मच अशा संस्कारातून झाल्यामुळे कर्करोगाचं निदान मला मुळापासून हादरवू शकलं नाही. म्हणूनच माझ्या बव्हंशी निर्णयांमागची प्रेरणा माझी आई; जिला मी ‘अहो बाई’ म्हणत आलो आहे, ती होती. प्रहार कसेही असोत, कितीही कठीण असोत, ते झेलण्याची क्षमता तिच्यामुळेच माझ्या ठायी आली.
संकलन : प्रतिनिधी