मी चूक केली, पण कर्नाटकाची जनता करणार नाही, अमित शाहांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 05:08 PM2018-03-30T17:08:41+5:302018-03-30T17:08:41+5:30
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी कर्नाटकात भाषणादरम्यान झालेल्या गोंधळाची चुकी मान्य केली आहे. परंतु शाह यांनी चूक मान्य करताना तो विषय वेगळ्या पद्धतीनं हाताळला आहे.
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी कर्नाटकात भाषणादरम्यान झालेल्या गोंधळाची चुकी मान्य केली आहे. परंतु शाह यांनी चूक मान्य करताना तो विषय वेगळ्या पद्धतीनं हाताळला आहे. मी चूक केली, पण कर्नाटकाची जनता करणार नाही, येडियुरप्पाच्या विधानावर अमित शाहांनी अशा प्रकारे खुलासा केला आहे. शाह यांनी म्हैसूरमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हे विधान केलं आहे.
भाजपाच्या हिंदीतून कन्नडमध्ये भाषांतर करणा-या व्यक्तीनं अमित शाहांना गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आणलं आहे. सिद्धरामय्या सरकारवर टीकेची झोड उठवतानाच चुकून येडियुरप्पा सरकारवर अमित शाहांनी टीका केली होती. भ्रष्टाचारासाठी जर कुठल्या सरकारला बक्षीस द्यायची वेळ आलीच, तर त्यासाठी येडियुरप्पा सरकार पात्र असे, असे अनवधानानं अमित शाह बोलून गेले होते. त्याचप्रमाणे भाजपा खासदार प्रल्हाद जोशी यांनी अमित शाह यांचं भाषण चुकीच्या पद्धतीनं भाषांतरित केलं आहे.
येडियुरप्पा आणि मोदी मिळून देशाला प्रगतिपथावर नेतील, असं अमित शाह म्हणाले होते. परंतु भाषांतरकारानं त्याचं काही तरी भलतंच भाषांतर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब, दलित आणि मागास वर्गासाठी काहीही करणार नाहीत. ते देशाला उद्ध्वस्त करतील. तुम्ही त्यांना मतदान करू नका, अमित शाह यांच्या विधानाचं प्रल्हाद जोशी यांनी असं भाषांतर केलं आहे.
उत्तर भारतीय भाजपा नेत्यांना दक्षिण भारतात प्रचार करण्यासाठी अनेकदा भाषेच्या अडचणीचा सामना करावा लागतो. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूमध्ये सभेसाठी आले होते, तेव्हाही त्यांनी हिंदीतून भाषण केलं होतं. तेव्हा ते भाषण अनेक लोकांना समजलंच नव्हतं. कर्नाटकातील लोकांना हिंदी भाषा समजत नसल्यानं ब-याचदा अमित शाह यांचं हिंदीतील भाषण केंद्रीय मंत्री अनंत हेगडे कन्नडमध्ये भाषांतरित करत असतात. तर काही ठिकाणी हे काम प्रल्हाद जोशी करतात.